भरदिवसा सराफ व्यावसायिकाला इनोव्हातून उचललं, काही तासांत गाडी सापडली अन् उघडलं तेलंगणा कनेक्शन! बुलढाण्यात अपहरणाच्या थराराला अनपेक्षित वळण

बुलढाणा : भरदिवसा तहसील कार्यालयासमोरून एका सराफ व्यावसायिकाला इनोव्हा कारमधून घेऊन जाण्यात आल्याने बुलढाणा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. चार जण अचानक आले आणि २८ वर्षीय व्यापाऱ्याला सोबत घेऊन गेले. सुरुवातीला हा अपहरणाचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र, पोलिसांनी काही तासांतच तपासाची चक्रे फिरवली आणि या प्रकरणात अनपेक्षित माहिती समोर आली. संबंधित तरुण सुरक्षित आढळला; पण त्याला घेऊन जाणारे तेलंगणा पोलीस असल्याचे उघड झाल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

देऊळगाव राजा तालुक्यातील देऊळगाव मही येथील रहिवासी अनिरुद्ध शिंगणे हे योगीराज ज्वेलर्सचे मालक आहेत. सराफ व्यवसायासोबतच ते बांधकाम व्यवसायातही कार्यरत आहेत. सोमवारी, २ नोव्हेंबर रोजी दुपारी एक ते दीडच्या दरम्यान देऊळगाव राजा येथील तहसील कार्यालयासमोर असताना इनोव्हा कारमधून आलेल्या चार जणांनी त्यांना सोबत नेले. भरवस्तीत आणि दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेनंतर अनिरुद्ध यांच्या नातेवाईकांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. संबंधित इनोव्हा कार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आल्याने तिचा माग काढण्याचे काम सुरू झाले. व्यापारी व्यवसायात असलेल्या तरुणाला नेमके कोणी नेले आणि त्यामागे काय कारण असावे, याचा शोध घेत पोलिसांनी वेगाने हालचाली केल्या.

लव्हाळा फाट्यावर गाडी सापडली, अपहरणाच्या चर्चेला नवे वळण!

तपासादरम्यान संशयित इनोव्हा कार साखरखेर्डा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लव्हाळा फाटा येथे आढळून आली. देऊळगाव राजा पोलिसांनी ही गाडी ताब्यात घेतली. त्याचवेळी अनिरुद्ध शिंगणे सुरक्षित असल्याची माहिती समोर आली. मात्र, त्यांना घेऊन गेलेले चार जण खासगी अपहरणकर्ते नसून तेलंगणा पोलीस असल्याचे तपासात पुढे आल्याचे वृत्त आहे.
या माहितीमुळे प्रकरणातील गूढ अधिकच वाढले आहे. तेलंगणा पोलिसांनी अनिरुद्ध यांना कोणत्या प्रकरणात ताब्यात घेतले? त्यांच्यावर नेमका कोणता आरोप आहे? त्यांना तेलंगणात घेऊन जाण्याची कारवाई कोणत्या कारणासाठी करण्यात आली? सर्वात महत्त्वाचे म्हणजे, एवढी मोठी कारवाई करताना स्थानिक पोलिसांना कोणतीही माहिती का देण्यात आली नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे काय म्हणाले?
या संपूर्ण प्रकाराची चौकशी सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी दिली. तेलंगणा पोलिसांनी स्थानिक पोलिसांना कोणतीही पूर्वसूचना न देता अनिरुद्ध यांना ताब्यात का घेतले, याची पडताळणी केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या संबंधित तरुण, इनोव्हा कार आणि या प्रकरणातील व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती आहे.
दरम्यान, सुरुवातीला अपहरणाचा संशय निर्माण करणाऱ्या या घटनेत तेलंगणा पोलिसांचे कनेक्शन समोर आल्याने बुलढाण्यात चर्चांना उधाण आले आहे. अनिरुद्ध शिंगणे यांना कोणत्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आणि या कारवाईमागील नेमके कारण काय, हे पोलिसांच्या पुढील तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
