आधी कोट्यवधींची उधळपट्टी, मग खासगी व्हिडीओंच्या नावाने धमकी? मॉडेलविरोधात १.३९ कोटींच्या खंडणीचा गुन्हा; व्यावसायिकाच्या तक्रारीने खळबळ!


ठाणे : आलिशान सदनिका, महागडी मोटार, बंगळुरूमधील मालमत्ता आणि परदेशातील महागड्या सहली… एका प्रसिद्ध मॉडेलच्या जीवनशैलीवर व्यावसायिकाने कोट्यवधी रुपये खर्च केल्याचा दावा केला आहे. मात्र, याच व्यावसायिकाने आता मॉडेलविरोधात तब्बल १ कोटी ३९ लाख रुपयांची खंडणी उकळल्याची तक्रार दाखल केली आहे. खासगी छायाचित्रे आणि चित्रफिती प्रसारित करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याचा आरोप असून, या प्रकरणाने ठाण्यात खळबळ उडाली आहे.

ठाण्यातील कासारवडवली पोलिस ठाण्यात व्यावसायिकाच्या तक्रारीवरून मॉडेलविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हनीट्रॅपमध्ये अडकवून बदनामी करण्याची आणि खोट्या पोलिस प्रकरणांत अडकवण्याची धमकी देत पैसे घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

महागडी मोटार, सदनिका आणि चार देशांचा दौरा!

व्यावसायिकाच्या तक्रारीनुसार, मॉडेलसाठी आलिशान फ्लॅट, एमजी हेक्टर मोटार, बंगळुरूमधील मालमत्ता आणि कार्यालयासाठी जागा घेण्यावर खर्च करण्यात आला. याशिवाय बँकॉक, व्हिएतनाम, जॉर्जिया आणि बाकू या ठिकाणच्या परदेश दौऱ्यांचाही खर्च व्यावसायिकाने केल्याचा दावा आहे. या खर्चाचा उल्लेखही तक्रारीत करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

मॉडेलने आधीच व्यावसायिकाविरोधात केली होती तक्रार

या प्रकरणाला वेगळे वळण देणारी बाब म्हणजे, व्यावसायिकाच्या तक्रारीपूर्वी मॉडेलनेच त्याच्याविरोधात वर्सोवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पाठलाग, मारहाण आणि बलात्काराचे आरोप तिने केले होते. हे गुन्हे आपल्यावर दबाव आणण्यासाठी दाखल करण्यात आल्याचा दावा व्यावसायिकाच्या वकिलांनी केला आहे.

खासगी फोटो-व्हिडीओ प्रसारित करण्याची धमकी?

व्यावसायिकाचे काही खासगी फोटो आणि व्हिडीओ मॉडेलकडे असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. ही सामग्री समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची तसेच खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. संबंधित मॉडेलचे समाजमाध्यमांवर दहा लाखांहून अधिक अनुयायी असल्याची माहिती आहे.

दरम्यान, कापूरबावडी पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. एका बाजूला मॉडेलने व्यावसायिकाविरोधात केलेले गंभीर आरोप, तर दुसरीकडे व्यावसायिकाने दाखल केलेली खंडणीची तक्रार, यामुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. दोन्ही बाजूंच्या आरोपांची सत्यता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!