एनसीडीसीच्या ९३ व्या महापरिषदेत मोठा निर्णय; २५ वर्षांचा रोडमॅप तयार करण्याचे अमित शाह यांचे निर्देश


पुणे : देशातील सहकार क्षेत्राला आगामी काळात अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी केंद्र सरकारने मोठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रीय सहकारी विकास निगमने (एनसीडीसी) आगामी २५ वर्षांतील सहकार क्षेत्राच्या विकासासाठी सर्वंकष रोडमॅप येत्या दोन महिन्यांत तयार करावा, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय सहकार व गृहमंत्री अमित शाह यांनी दिले आहेत. नवी दिल्ली येथील एनसीडीसी मुख्यालयात आयोजित ९३ व्या महापरिषदेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

या बैठकीत एनसीडीसीचे संचालक तथा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी साखर उद्योग आणि सहकार क्षेत्राशी संबंधित महत्त्वाचे मुद्दे मांडले.

अमित शाह यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात भारताच्या सर्वांगीण विकासामध्ये एनसीडीसीची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. आगामी २५ वर्षांसाठी तयार करण्यात येणाऱ्या रोडमॅपमध्ये संस्थात्मक रचना, संसाधनांचे व्यवस्थापन आणि आधुनिक कार्यपद्धतीतील बदलांचा प्रामुख्याने समावेश करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

ईशान्य भारतातील सहकारी प्रकल्पांचे कौतुक करताना शाह म्हणाले की, २०१३ पासून पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय क्षेत्राला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी राबवण्यात आलेल्या विशेष प्रकल्पांमुळे उत्पन्नात सुमारे ३३ हजार कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तसेच या प्रकल्पांमधून जवळपास ८ लाख नवीन रोजगार निर्माण झाले आहेत.

सहकारी संस्थांना ४ लाख कोटींच्या कर्जपुरवठ्याचे नियोजन

बैठकीनंतर हर्षवर्धन पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालू वर्षात देशभरातील सहकारी संस्थांना १ लाख ५० हजार कोटी रुपयांचा कर्जपुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पुढील पाच वर्षांत हा कर्जपुरवठा तब्बल ४ लाख कोटी रुपयांपर्यंत नेण्याचे दीर्घकालीन नियोजनही बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.

साखर उद्योगाला ४० हजार कोटींचे कर्ज

एनसीडीसीच्या माध्यमातून देशातील साखर उद्योगाला आतापर्यंत ४० हजार कोटी रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील साखर कारखानदारीसाठी ४ हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या सहकार्याबद्दल राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे विशेष अभिनंदन करून आभार मानले.

देशभरात एनसीडीसीचे मजबूत जाळे

देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एनसीडीसीने आपले मजबूत जाळे निर्माण केले आहे. या माध्यमातून साखर उद्योगासह कृषी प्रक्रिया उद्योग, शेतकरी, दुग्ध उत्पादक, मत्स्यव्यवसाय, महिला बचत गट आणि ‘भारत टॅक्सी’सारख्या उपक्रमांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळत असल्याचे अमित शाह यांनी नमूद केले.

आगामी २५ वर्षांचा विकास आराखडा तयार झाल्यानंतर सहकार क्षेत्रातील संस्थात्मक क्षमता, आर्थिक नियोजन आणि आधुनिक कामकाजाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!