मुलगा तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा, आई लग्नाचं आमिष दाखवायची; पुढे जे घडायचं ते धक्कादायक! मायलेकाचं रॅकेट उघड


नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआर परिसरातील तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेशातील अलीगडमध्ये एका तरुणाने आपल्या आईच्या मदतीने अनेक तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

आक्षेपार्ह व्हिडिओंच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून लाखो रुपये आणि मौल्यवान वस्तू उकळल्याचेही तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी हिमांशु माथुर याला अटक केली असून, त्याची आई पूजा माथुर हिचा शोध सुरू आहे.

सोशल मीडिया आणि मॅट्रिमोनियल साइट्सच्या माध्यमातून ओळख

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी सोशल मीडिया, मॅट्रिमोनियल वेबसाइट्स आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सुशिक्षित तरुणींशी ओळख वाढवत असे. स्वतःला घटस्फोटित आणि एकटा असल्याचे सांगून तो त्यांचा विश्वास संपादन करत असे. त्यानंतर तरुणींची ओळख आपल्या आईशी करून देत असे. आईकडून लग्नाला संमती असल्याचा विश्वास निर्माण झाल्याने तरुणी आरोपीच्या आश्वासनांवर विश्वास ठेवत असल्याचा आरोप आहे.

यानंतर आरोपी तरुणींना हॉटेलमध्ये बोलावून त्यांच्यावर अत्याचार करत असे आणि आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून त्याद्वारे ब्लॅकमेल करत असे, असा आरोप आहे. या माध्यमातून त्याने अनेक तरुणींकडून पैसे, सोन्याचे दागिने आणि महागड्या वस्तू घेतल्याचे तपासात समोर आले आहे.

एका तरुणीकडून 12 लाख रुपये आणि सोन्याचे दागिने घेतल्याचा आरोप

गाझियाबाद येथील एका तरुणीने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली होती. 16 ऑगस्ट 2025 रोजी तिची हिमांशुशी ओळख झाली. त्यानंतर 30 ऑगस्ट 2025 रोजी अलीगडमधील एका हॉटेलमध्ये त्याने तिच्यावर बळजबरी केल्याचा आरोप आहे.

तक्रारीनुसार, आरोपीने विविध कारणे सांगून तिच्याकडून 12 लाख रुपये रोख, 50 हजार रुपये ऑनलाइन आणि सुमारे 63 ग्रॅम सोन्याचे दागिने घेतले. पैसे परत मागितल्यानंतर तिला मारहाण आणि ब्लॅकमेल केल्याचाही आरोप आहे.

घरात घुसून मारहाण केल्याची तक्रार

पीडित तरुणीला आरोपीच्या मोबाइलमध्ये इतर तरुणींचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत जाब विचारल्यानंतर आरोपीने तिला मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच 13 ऑक्टोबर रोजी तिच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून मारहाण केली आणि आयफोनसह सोन्याचे दागिने घेऊन गेल्याची तक्रार आहे. व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन तो तिला त्रास देत असल्याचेही तिने म्हटले आहे.

आणखी तरुणींची फसवणूक झाल्याचा संशय

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी गेल्या पाच वर्षांपासून अशा प्रकारे तरुणींना लक्ष्य करत असल्याचा संशय आहे. आतापर्यंत 10 ते 12 तरुणींची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. अन्य दोन तरुणींनीही पुढे येऊन तक्रारी केल्याचे वृत्त असून, त्यापैकी एकीची सुमारे सव्वा कोटी रुपये आणि दुसरीची 30 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे.

अलीगडमधील क्वार्सी पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली असून, त्याची आई पूजा माथुर हिच्या भूमिकेची चौकशी करण्यासाठी तिचा शोध सुरू आहे. या प्रकरणात आणखी पीडित आहेत का, तसेच आर्थिक व्यवहारांचा नेमका तपशील काय आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!