मध्यरात्री प्रियकराला VIDEO कॉल करून लग्नासाठी तगादा; काही तासांत सॉफ्टवेअर इंजिनीअरचा मृत्यू, नेमकं काय घडलं?


हैदराबाद : सॉफ्टवेअर इंजिनीअरचा मृतदेह राहत्या घरात संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. लग्नास नकार देणाऱ्या प्रियकराला व्हिडीओ कॉलवर धमकी दिल्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणाचा मृतदेह फ्लॅटमध्ये सापडला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अर्चना चौधरी मलिक असं मृत तरुणीचं नाव आहे. ती २९ वर्षांची होती.

हैदराबादच्या माइंडस्पेस आयटी कॉरिडॉरमधील एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या अर्चना मलिकचा मृतदेह राहत्या घरी आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चनानं रात्री अडीचच्या सुमारास तिच्या ऑफिसमधील एका सहकाऱ्याला व्हिडीओ कॉल केला होता.

त्यावेळी तिचा सहकारी शहराच्या बाहेर त्याच्या आई सोबत एका कार्यक्रमात होता. माझ्या सोबत लग्न केलं नाहीस, तर जीव देईन, अशी धमकी अर्चनानं संबंधित सहकाऱ्याला व्हिडीओ कॉलवर दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकाऱ्यानं अर्चनाला वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण तिनं प्रतिसाद दिला नाही. अखेर पहाटे साडे पाचच्या सुमारास तो अर्चनाच्या फ्लॅटवर पोहोचला. तेव्हा दरवाजा आतून बंद होता. परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिसांनी घटनास्थळ गाठलं आणि फ्लॅटचा दरवाजा तोडला. तेव्हा आतमध्ये अर्चना मृतावस्थेत सापडली.

पोलिसांनी फ्लॅट सील केला असून फॉरेन्सिक पथकानं घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. अर्चनाचं शव पोस्टमॉर्टमसाठी उस्मानिया जनरल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चनाचे तिच्याच ऑफिसात काम करणाऱ्या विमलशी प्रेम संबंध होते. तो मूळचा उत्तराखंडचा रहिवासी आहे.

विमल आधीपासूनच विवाहित असून त्याच्या घटस्फोटाची केस न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे. माधापूर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. विमल आणि अर्चना यांच्यात झालेला संवाददेखील तपासाचा भाग आहे.

दरम्यान, याच वर्षीच्या फेब्रुवारीत हैदराबादमध्ये एका यूट्यूबर तरुणीनं जीवन संपवलं होतं. ती मूळची आंध्र प्रदेशची रहिवासी होती. मृत्यूच्या काही तास आधी तिनं आईला मेसेज केला होता. ‘आय लव्ह यू मम्मी’ असा मेसेज करून तिनं जीव दिला. ती २१ वर्षांची होती. गळफास घेऊन तिनं जीवन संपवलं.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!