१० वर्षांच्या चिमुरडीसोबत बापाचं अमानुष कृत्य! कपडे काढून सिगारेटचे चटके दिले, केसही कापले..

छत्रपती संभाजीनगर : शहरातील सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पित्याने आपल्या १० वर्षांच्या मुलीला अमानुष वागणूक दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीला मारहाण करून सिगारेटचे चटके देणे, तिच्या अंगावर थंड पाणी टाकणे आणि तिचे केस कापल्याचा आरोप संबंधित पित्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या मोठ्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नराधम बाप एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने मुलीच्या डोक्यावरील केस कापून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या २४ वर्षीय मोठ्या भावाने सिडको पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. सिडको पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
मनाविरुद्ध वागल्यास करायचा अमानुष मारहाण


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पिता सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. तो पेंटिंगचं काम करतो. त्याला दोन मुलं आणि एक १० वर्षांची मुलगी आहे. पीडित मुलगी पाचवीच्या वर्गात शिक्षण घेते. आरोपी पिता स्वभावाने अत्यंत क्रूर असून, मुले त्याचे ऐकत नसतील किंवा त्याच्या मनाविरुद्ध वागत असतील तर तो त्यांना अमानुषपणे मारहाण करत असल्याचं तपासातून समोर आलं आहे.
रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारा हा प्रकार रविवारी मध्यरात्री घडला. आरोपीने आपल्याच १० वर्षांच्या लेकीचे जबरदस्तीने कपडे काढले, तिच्या अंगावर कडाक्याच्या थंडीत गार पाणी टाकले आणि तिच्या हात-पायांवर जळत्या सिगारेटचे चटके दिले. त्यानंतर तिच्या डोक्यावरचे केस कापून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असं अमानुष कृत्य केलं.
या अमानुष अत्याचारानंतर रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास पीडितेच्या मोठ्या भावाला त्याच्या काकांनी फोन करून वडील आणि बहीण घरात नसल्याची माहिती दिली. त्याने आपल्या बहिणीचा शोध घ्यायला सुरुवात केली. पण तिचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. दरम्यान, काही वेळानंतर जटवाडा परिसरात राहणाऱ्या मावशीच्या मुलीचा त्याला फोन आला आणि पीडित चिमुकली तिच्या घरी पोहोचल्याचं तिने सांगितलं.
माहिती मिळताच मोठा भाऊ तत्काळ मावशीच्या मुलीच्या घरी पोहोचला. तेथे अत्यंत भयभीत झालेल्या आणि रडणाऱ्या लहान बहिणीला त्याने विश्वासात घेऊन विचारपूस केली. तेव्हा त्या चिमुकलीने रात्री जन्मदात्या बापाने केलेल्या सर्व अमानुष अत्याचाराचा पाढा भावासमोर वाचला.
बहिणीसोबतच्या अमानुष कृत्याची माहिती मिळताच संतापलेल्या भावाने क्षणाचाही विलंब न लावता थेट सिडको पोलीस ठाणे गाठले आणि जन्मदात्या पित्याविरुद्ध अधिकृत तक्रार नोंदवली. भावाच्या फिर्यादीवरून सिडको पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.
