पावसाळा संपल्यानंतर पुन्हा पावसाचा जोर वाढणार! पुढील ३ दिवस महाराष्ट्रातील ‘या’ भागांत पावसाचा अंदाज

मुंबई : राज्यातून मान्सूनने माघार घेतल्यानंतर पुन्हा एकदा मान्सूनोत्तर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १७ ते १९ ऑक्टोबरदरम्यान राज्यातील विविध भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहू शकतात. विशेषतः कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

१७ ऑक्टोबरला कोणत्या भागांत पाऊस?
१७ ऑक्टोबर रोजी दक्षिण कोकण-गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मेघगर्जनेसह विजा चमकण्याची शक्यता आहे. या भागांत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगली, सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा अंदाज आहे.


१७ ऑक्टोबरचा विभागवार अंदाज
कोकण: तुरळक ठिकाणी पाऊस आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
मध्य महाराष्ट्र: काही ठिकाणी पाऊस आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता.
मराठवाडा: तुरळक ठिकाणी पाऊस आणि मेघगर्जनेचा अंदाज.
विदर्भ: हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता.
१८ आणि १९ ऑक्टोबरला कसं असेल हवामान?
१८ ऑक्टोबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भातही काही ठिकाणी पाऊस पडू शकतो.
१९ ऑक्टोबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक भागांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी हवामान विभागाच्या अद्ययावत सूचनांकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
मान्सूनोत्तर पावसामुळे काही भागांत उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता असली, तरी वादळी वारे आणि विजांचा कडकडाट यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी पाऊस आणि वादळी वाऱ्यांच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. शेतकऱ्यांनी काढणीला आलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी ठेवावा किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. अचानक हवामान बदलल्यास संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
