थेट निलंबित करणार! देवेंद्र फडणवीस संतापले; मंत्र्यांना म्हणाले, फक्त नाव सांगा, बैठकीत नेमकं काय घडलं?

मुंबई : आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. दुष्काळ निवारणाचा मुद्दा आजच्या बैठकीत केंद्रस्थानी होता. दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आणखी ४० तालुक्यांचा समावेश करण्यात आल्याने आता राज्यातील एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

दुसरीकडे, सध्याची परिस्थिती लक्षात घेता सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांची अग्रीम आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरून चांगलेच संतापल्याचे समोर आले आहे.
अधिकाऱ्यांना थेट निलंबित करण्याचा इशारा


आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळ निवारणाच्या उपाययोजनांवर चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी काही मंत्र्यांनी अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत तक्रारी केल्या. सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाची परवानगी मिळत नसल्याचे कारण देत काही अधिकारी दुष्काळासंदर्भातील बैठकांना उपस्थित राहण्यास टाळाटाळ करत असल्याचे मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. आचारसंहितेचे कारण देत दुष्काळ निवारणाच्या बैठकीला एखादा अधिकारी अनुपस्थित राहत असेल, तर त्याचे नाव आपल्याला कळवावे. संबंधित अधिकाऱ्याला थेट निलंबित केले जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
दुष्काळ निवारणाच्या कामांकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक असून, त्यासाठी तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. परवानगी घेण्याच्या प्रक्रियेत अडकून न पडता दुष्काळ निवारणाच्या कामांना प्राधान्य द्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी कोणते निर्णय?
दिवाळीपूर्वी ज्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसेच शंभर टक्के पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याबाबतही निर्णय घेण्यात आला आहे.
याशिवाय, आणखी ४० तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात आल्याने राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या आता ३०५ झाली आहे. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत देण्यात येणार असून, राज्यातील सुमारे सव्वा कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
या मदतीसाठी राज्य सरकारकडून सुमारे ६ हजार कोटी रुपये खर्च केले जाण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी मिळणाऱ्या या आर्थिक मदतीकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
