अंगणवाडी सेविका-मदतनीसांना दिवाळीआधी लॉटरी! भाऊबीज भेटीची घोषणा, खात्यात जमा होणार पैसे..

मुंबई : राज्यातील लाखो अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. दिवाळीच्या सणानिमित्त राज्य सरकारकडून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना प्रत्येकी २ हजार रुपयांची भाऊबीज भेट देण्यात येणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत घोषणा केली आहे. ही रक्कम दिवाळीपूर्वीच संबंधित कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे नियोजन आहे.

२ लाखांहून अधिक सेविका-मदतनीसांना लाभ
महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यभरात अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कार्यरत आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार, राज्यात १ लाख ८ हजार ६२७ अंगणवाडी सेविका आणि १ लाख ५ हजार ४७० अंगणवाडी मदतनीस कार्यरत आहेत. या दोन्ही गटांतील एकूण २ लाख १४ हजार ९७ कर्मचाऱ्यांना या भाऊबीज भेटीचा लाभ मिळणार आहे.


या योजनेसाठी राज्य सरकारने ४२ कोटी ८१ लाख ९४ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना आर्थिक मदत मिळणार आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस राज्यातील गर्भवती महिला, स्तनदा माता आणि लहान बालकांच्या आरोग्य व पोषणासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या कामाची दखल घेत, सणासुदीच्या काळात आर्थिक हातभार लागावा आणि त्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या उद्देशाने ही भाऊबीज भेट देण्यात येत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. दिवाळीपूर्वी ही रक्कम खात्यात जमा झाल्यास अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना सणाच्या खरेदीसाठी आर्थिक दिलासा मिळणार आहे.
