शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा धसका! भीमा पाटस साखर कारखान्यात वाहतूक ठप्प, वाहनं जागेवरच


दौंड : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेने साखर वाहतूक बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला साखर वाहतूक करणाऱ्या वाहनांचे मालक आणि चालकांकडून पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.

दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावर शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले असून, साखर वाहतूक करणारी अनेक वाहने मागील दोन दिवसांपासून जागेवर उभी आहेत.

उसाला प्रति टन ७,५०० रुपये भाव द्यावा, साखरेची विक्री ७० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने करावी, शेतीसाठी केलेली उपसाबंदी उठवावी आणि दोन साखर कारखान्यांमधील हवाई अंतराची अट रद्द करावी, अशा प्रमुख मागण्या संघटनेने केल्या आहेत. या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत साखर वाहतूक आणि ऊस गाळप सुरू करू देणार नसल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

भीमा पाटस कारखान्याच्या प्रवेशद्वारावर ठिय्या

शेतकरी संघटनेचे नेते शिवाजीराव नांदखिले यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि. १३) पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले. कारखान्यातून बाहेर पडणारी साखर वाहतूक करणारी वाहने अडवून चालकांना गुलाबपुष्प देण्यात आले. तसेच साखर वाहतूक बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.

या आंदोलनानंतर कारखान्याच्या आवारात साखर वाहतूक करणारी अनेक वाहने उभी आहेत. साखर कारखाने १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याची भूमिका सरकार आणि कारखानदारांनी घेतली असताना, दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत वाहतूक सुरू होऊ देणार नसल्याची भूमिका शेतकरी संघटनेने घेतली आहे.

उसाला ७५०० रुपये भाव देण्याची मागणी

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन ७,५०० रुपये भाव मिळावा, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे. याशिवाय साखरेची विक्री ७० ते ८० रुपये प्रतिकिलो दराने करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. हा दर देणे शक्य नसेल, तर दोन साखर कारखान्यांमधील २५ किलोमीटरच्या हवाई अंतराची अट रद्द करावी, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.

सरकार आणि साखर कारखानदारांनी मागण्या मान्य न केल्यास कारखान्यांतून साखर बाहेर पडू देणार नाही, असा इशारा शिवाजीराव नांदखिले यांनी दिला आहे. त्यामुळे साखर वाहतूक बंद आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दौंडसह पुणे जिल्ह्यातील साखर वाहतूक ठप्प

शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दौंड तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांवर आंदोलन सुरू केले आहे. कारखान्यांच्या गोदामांमधून होणारी साखर वाहतूक रोखण्यात येत असल्याचे चित्र आहे.

दौंड तालुक्यातील सहकारी साखर कारखाना आणि सध्या भाडेतत्त्वावर चालविण्यास दिलेल्या निराणी शुगर्स लिमिटेड या कारखान्यातूनही साखर वाहतूक ठप्प झाल्याची माहिती आहे. मागील दोन दिवसांपासून कारखान्याच्या आवारात तसेच अष्टविनायक रस्त्यालगत साखर वाहतूक करणारी अनेक वाहने उभी आहेत.

वाहनमालक आणि चालकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

साखर वाहतूक बंद आंदोलनाला वाहनमालक आणि चालकांचा पाठिंबा मिळत असल्याचे संघटनेने सांगितले आहे. पुणे जिल्ह्यासह राज्यातील इतर साखर कारखान्यांशी संबंधित साखर वाहतूक वाहनांचे मालक आणि चालक यांनीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सहकार्य करावे, असे आवाहन शिवाजीराव नांदखिले यांनी केले आहे.

एकीकडे साखर कारखाने सुरू करण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या मागण्यांवरून आंदोलन पेटले आहे. आता सरकार आणि साखर कारखानदार या मागण्यांबाबत काय भूमिका घेतात, याकडे ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर वाहतूकदारांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!