छ. संभाजीनगर हादरलं! नवरा बनावट अधिकारी, रात्री आईला फोन केला अन् दुसऱ्या दिवशी आयुष्याचा शेवट

छत्रपती संभाजीनगर : मोठ्या विश्वासाने आणि अनेक स्वप्नं उराशी बाळगून मुलीचं लग्न लावून दिलं. मात्र, लग्नानंतर पती शासकीय सेवेत अधिकारी नसल्याचं समोर आलं. त्यानंतर सासरच्या मंडळींकडून छळ होत असल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे.

या सगळ्या परिस्थितीत लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांत नवविवाहितेनं आयुष्य संपवलं. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे.
संजना नीलेश शेजवळ (वय २३) असं मृत विवाहितेचं नाव आहे. छत्रपती संभाजीनगरमधील एन-१३ येथील वानखेडेनगर परिसरात मंगळवारी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी माहेरच्या नातेवाइकांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात धाव घेत कारवाईची मागणी केली.


जालना येथील रावसाहेब मगरे यांची संजना ही धाकटी मुलगी होती. तिने संगणकशास्त्रात डिप्लोमा पूर्ण केला होता. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश हा शासकीय सेवेत अधिकारी असल्याचं सांगून त्याचं स्थळ संजनासाठी आलं होतं. नीलेशचे वडीलही शासकीय विभागात नोकरीला असल्याने हे स्थळ चांगल्या कुटुंबातील असल्याचा विश्वास संजनाच्या वडिलांना वाटला.
मुलीचं भविष्य सुरक्षित राहावं, या अपेक्षेने रावसाहेब यांनी कर्ज काढून ४ जून २०२६ रोजी तिचं थाटामाटात लग्न लावून दिलं. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच नीलेश शासकीय सेवेत अधिकारी नसल्याचं समोर आल्याचा दावा नातेवाइकांनी केला. या प्रकारामुळे संजनाची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली होती, असंही त्यांनी सांगितलं.
स्वयंपाक आणि कपड्यांवरून टोमणे मारल्याचा आरोप
लग्नानंतर पती शासकीय सेवेत नसल्याचं समोर आल्यानंतरही संजनाने संसार सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्वयंपाक करण्याची पद्धत, कपडे परिधान करण्याची पद्धत आणि इतर किरकोळ कारणांवरून तिला सतत हिणवलं जात असल्याचा आरोप माहेरच्या नातेवाइकांनी केला आहे. सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या कथित त्रासामुळे संजना मानसिक तणावाखाली होती, असंही नातेवाइकांनी म्हटलं आहे.
घटनेच्या आदल्या रात्री आईला केला फोन
घटनेच्या आदल्या रात्री संजनाने आईला फोन केला होता. पती आणि सासरचे लोक सतत टोमणे मारत असल्याचं सांगताना तिला रडू कोसळलं होतं. ‘मी आज जेवणारही नाही,’ असं सांगून तिने फोन ठेवला. मुलीची अवस्था ऐकून वडिलांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. ‘शांत झोप, मी सकाळीच येतो,’ असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. मात्र, दुसऱ्याच दिवशी संजनाच्या मृत्यूची बातमी कुटुंबीयांना समजली. या घटनेने तिच्या आई-वडिलांना मोठा धक्का बसला.
दररोज आईची काळजी घेणाऱ्या संजनाचा फोन आला नाही
संजनाला दररोज आईला फोन करण्याची सवय होती. आईने औषधं घेतली का, याची ती आवर्जून विचारपूस करायची. मात्र, घटनेच्या दिवशी तिचा फोन आला नाही. मुलीच्या आठवणी सांगताना आईला अश्रू अनावर झाले. संजनाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
माहेरच्या मंडळींचा आरोप
संजना घरातील वरच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आले. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास जालन्याहून माहेरचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचले. त्यावेळी त्यांना घटनेची माहिती मिळाली. सासरच्या मंडळींनी घटनेची माहिती देण्यास विलंब केल्याचा आरोप माहेरच्या नातेवाइकांनी केला आहे. माहेरचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचल्यानंतर पतीसह सासरची मंडळी तिथून निघून गेल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असतानाही सासरकडील एकही नातेवाईक उपस्थित नव्हता, असा आरोप करण्यात आला.
संतप्त नातेवाइकांची पोलिस ठाण्यात गर्दी
संजनाच्या मृत्यूची माहिती मिळताच संतप्त नातेवाइकांनी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गर्दी केली. संजनाला न्याय मिळावा आणि तिच्या मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव आणि उपनिरीक्षक मनीषा केदार यांनी कुटुंबीयांशी संवाद साधून योग्य कारवाईचं आश्वासन दिलं. संजनाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पती, सासू आणि सासरच्या इतर नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. कौटुंबिक हिंसाचार, मानसिक व शारीरिक छळ, हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांच्या अनुषंगाने पोलिसांकडून पुढील कारवाई केली जात होती.
मोबाईल फोन जप्त; पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी सांगितलं की, संजनाचा मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे. पती आणि अन्य संशयित अद्याप पोलिसांना मिळून आलेले नाहीत. अवघ्या चार महिन्यांत एका तरुणीचा मृत्यू होणं ही दुर्दैवी घटना आहे. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी सखोल तपास करून दोषींवर कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत असून, माहेरच्या मंडळींनी केलेल्या आरोपांची चौकशी झाल्यानंतरच प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
