आमदार माऊली कटके यांचा उद्या कुंजीरवाडीत ‘जनता दरबार’! महसूलच्या महारास्व अभियानानंतर जनता दरबार हा उपक्रम घेणार हाती…


लोणी काळभोर : पूर्व हवेलीतील विकासकामे आणि नागरिकांच्या वाढत्या नागरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली आबा कटके यांनी नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या पुढाकारातून रविवारपासून (ता. ११) कुंजीरवाडी येथे ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात येणार असून, यामध्ये नागरिकांच्या समस्या, तक्रारी आणि प्रलंबित कामांचा आढावा घेतला जाणार आहे.

पूर्व हवेलीतील नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागू नयेत, तसेच त्यांच्या तक्रारींची संबंधित विभागांकडून दखल घेतली जावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांना थेट लोकप्रतिनिधींसमोर आपली बाजू मांडता येणार असून, प्रलंबित प्रश्नांच्या निवारणासाठी संबंधित शासकीय यंत्रणांकडे पाठपुरावा करण्यावर भर दिला जाणार आहे.

पूर्व हवेली परिसरात झपाट्याने नागरीकरण होत असताना पाणीपुरवठा, रस्ते, वाहतूक, आरोग्य आणि मूलभूत नागरी सुविधांचे प्रश्नही वाढत आहेत. त्याचबरोबर विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी आणि प्रलंबित कामांबाबतच्या तक्रारींवरही जनता दरबारात चर्चा होणार आहे. संबंधित विभागांशी समन्वय साधून या प्रश्नांच्या निवारणासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत कुंजीरवाडी येथील आमदार माऊली कटके यांच्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार होणार आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी चौकात, स्नेहल हॉटेलसमोर आणि आदित्य मेडिकलच्यामागे हे कार्यालय आहे.

नागरिकांनी आपल्या समस्या, अडचणी आणि तक्रारी घेऊन जनता दरबारात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी केले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!