मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून तयार झालेल्या ‘वारी’वरील माहितीपटाचा जागतिक स्तरावर सन्मान; ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट ब्रॅन्ड…..


मुंबई : पंढरपूर आषाढी वारीचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत निर्मिती करण्यात आलेल्या ‘पंढरपूर वारी – इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ या माहितीपटाची प्रतिष्ठित ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स 2026’मध्ये ‘सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम’ श्रेणीत भारताचा राष्ट्रीय विजेता म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे हे जागतिक पटलावर उमटलेले प्रतिबिंबच आहे.

महाराष्ट्राचे वैभव असलेली पंढरपूर वारीची भक्तिमार्गातली समृद्ध परंपरा जगासमोर आणण्याच्या उद्देशाने या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली. माहिती व जनसंपर्क विभाग आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कवरी यांच्यामार्फत निर्मित या माहितीपटाचे डिस्कवरीच्या जगभरातील विविध वाहिन्यांवरुन प्रसारण करण्यात आले आहे.

महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा, वारकरी संप्रदायाचा आणि शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पंढरपूर वारीचा जागतिक प्रेक्षकांना परिचय करून देण्यासाठी 22 मिनिटांचा इंग्रजी भाषेतील माहितीपट तयार करण्यात आला आहे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांनी दिलेला भक्ती, समता, मानवता आणि बंधुभावाचा संदेश भाषेच्या मर्यादा ओलांडून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचविण्याच्या दृष्टीने हा माहितीपट महत्त्वपूर्ण ठरला आहे.

वारीच्या गौरवशाली परंपरेचा आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुमान – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंढरपूर वारी ही भक्तीमार्गातील अतिशय प्राचीन परंपरा असून ती जात, धर्म, गरीब-श्रीमंत असा कोणताही भेद न करता सर्वांना विठुरायाच्या रंगात रंगवून एकत्र आणते. ही महान परंपरा, तिचे उद्दिष्ट आणि विचार जगभरात पोहोचवण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागामार्फत ‘पंढरपूर वारी – इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ ही सुंदर डॉक्युमेंट्री तयार करून रिलीज करण्यात आली आहे.

या डॉक्युमेंट्रीला ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स 2026 मध्ये भारत देशासाठीचा ‘सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम’ हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. यासाठी माहिती व जनसंपर्क विभाग आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांचे मी अभिनंदन करतो. वारीची गौरवशाली परंपरा जगासमोर मांडणारी माहितीपट सर्वांनी पाहावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!