इंदापुरात बंद खोलीच्या दरवाजावरून मोठा राडा! दसऱ्याच्या साफसफाईवरून शेजाऱ्यांशी वाद, एकाच कुटुंबातील चौघांना मारहाण

इंदापूर : दसऱ्याच्या सणासाठी घराची साफसफाई करणे एका कुटुंबाला चांगलेच महागात पडल्याची घटना इंदापूर तालुक्यातील पिंपरी बुद्रुक येथे घडली आहे. बंद खोलीचा दरवाजा उघडल्याच्या कारणावरून शेजाऱ्यांशी वाद झाला आणि या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. २३ वर्षीय तरुणीसह तिची आई, वडील आणि भावाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेप्रकरणी सहा जणांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंद खोलीचा दरवाजा उघडताच वादाला सुरुवात

शिवानी नागनाथ भंडलकर (वय २३, रा. पिंपरी बुद्रुक) या दसऱ्यानिमित्त घरातील बंद खोली उघडून कपडे आणि इतर साहित्याची साफसफाई करत होत्या. साफसफाई झाल्यानंतर त्यांनी घरातील सामान बाहेर काढून ठेवले होते. त्याचवेळी शेजारी राहणारा शशिकांत भोई घराच्या मागील दरवाजातून आत आला. खोलीचा दरवाजा का उघडला, असा जाब विचारत त्याने शिवानी यांचे केस धरून मान मुरगळल्याचा आरोप आहे.


शिवानी यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्यांची आई रंजना घटनास्थळी आल्या. मात्र, त्यांनाही जमिनीवर ढकलून देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर वंदना भोई, सुसाबाई भोई, जया दत्तात्रय फतुले आणि ताई भोई तेथे आल्या. जया फतुले हिने हातातील टणक वस्तूने रंजना यांच्या छातीवर मारहाण केली, तर इतर महिलांनी शिवानी आणि त्यांच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मदतीला धावलेल्या वडील आणि भावालाही मारहाण
या प्रकारानंतर शिवानी यांनी फोन करून भाऊ शंभुराज याला बोलावले. त्यानंतर वडील नागनाथ आणि भाऊ शंभुराज घटनास्थळी पोहोचले. यावेळी शशिकांत भोई, प्रशांत भोई आणि दत्तात्रय फतुले हेही तेथे आले. त्यानंतर नागनाथ आणि शंभुराज यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
प्रशांत भोई याने शंभुराज यांची कॉलर पकडून त्यांच्या तोंडावर मारहाण केली, तर शशिकांत याने त्यांचा उजवा हात पिरगळल्याचा आरोप आहे. त्यामुळे घरातील वादात कुटुंबातील चौघे जण मारहाणीच्या घटनेत सापडल्याचे समोर आले आहे.
जीवे मारण्याची धमकी; सहा जणांविरुद्ध गुन्हा
मारहाणीच्या वेळी शिवानी आणि त्यांचा भाऊ शंभुराज यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच शंभुराज यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करून त्यांना तुरुंगात पाठवण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शिवानी भंडलकर यांच्या फिर्यादीवरून शशिकांत भोई, वंदना भोई, सुसाबाई भोई, जया दत्तात्रय फतुले, ताई भोई आणि प्रशांत भोई यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सणाच्या तयारीदरम्यान सुरू झालेला वाद मारहाणीपर्यंत पोहोचल्याने पिंपरी बुद्रुक परिसरात या घटनेची चर्चा सुरू आहे.
