‘दादांसारखी मी नाही!’ सुनेत्रा पवारांच्या त्या इशाऱ्यानंतर सोमेश्वरमध्ये मोठी कारवाई; पुरुषोत्तम जगतापांना पक्षातून बाहेरचा रस्ता, बारामतीच्या राजकारणात खळबळ!

बारामती : ‘दादा खूप मोठ्या मनाचे होते, दादांसारखी मी नाही,’ असे म्हणत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दोन दिवसांपूर्वी दिलेला इशारा आता चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार गटापासून वेगळी भूमिका घेत स्वतंत्र पॅनल उभे करणारे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांच्यासह त्यांच्या पॅनलमधील सदस्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अजितदादांच्या निधनानंतर बारामतीच्या राजकारणात घडणाऱ्या या घडामोडीमुळे सोमेश्वरच्या निवडणुकीतील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
सुनेत्रा पवारांचा इशारा, आता थेट कारवाई!

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे बारामती तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे. विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप हे अजित पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जात होते. मात्र, अजितदादांच्या पश्चात त्यांनी स्वतंत्र पॅनल उभे करण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली.


जगताप यांनी भाजपच्या पाठिंब्याने ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल’ निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. यामुळे अजित पवार गटासमोर आव्हान उभे राहिले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी कोणाचेही नाव न घेता बंडखोरांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला होता.
“कुठल्याही चुकीच्या अफवेला बळी पडू नका. एकदा बाहेर ते कायमचे बाहेर, एवढे लक्षात ठेवा. दादा खूप मोठ्या मनाचे होते, दादांसारखी मी नाही,” असे त्या म्हणाल्या होत्या. आता जगताप यांच्यासह त्यांच्या पॅनलमधील सदस्यांवर झालेल्या कारवाईमुळे या विधानाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
पत्रकार परिषदेत हकालपट्टीची घोषणा
या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. जिल्हाध्यक्ष राजेंद्र कोरेकर, संभाजी होळकर आणि बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव या वेळी उपस्थित होते.
तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी पुरुषोत्तम जगताप यांनी पक्षाच्या भूमिकेपासून दूर जात स्वतंत्र पॅनल उभे केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यासह त्यांच्या पॅनलमधील सदस्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यामुळे निवडणुकीतील राजकीय संघर्षाला आता नवे वळण मिळाले आहे.
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत; कोणाचे पारडे जड?
या निवडणुकीत तीन पॅनल आमनेसामने असल्याने मतदारांचा कौल निर्णायक ठरणार आहे. श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनल, लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल आणि सोमेश्वर शेतकरी विकास पॅनल यांच्यात ही लढत रंगणार आहे.
एकीकडे अजित पवार गटाने संघटनात्मक भूमिका स्पष्ट करत कारवाई केली आहे, तर दुसरीकडे पुरुषोत्तम जगताप यांच्या स्वतंत्र पॅनलमुळे निवडणुकीतील समीकरणे बदलली आहेत. भाजपच्या पाठिंब्याने उभ्या राहिलेल्या या पॅनलमुळे स्थानिक राजकारणात कोणाला फायदा होणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कारवाईचा निवडणुकीवर काय परिणाम होणार?
सोमेश्वर कारखान्याची निवडणूक आता केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित राहिलेली नाही. या निवडणुकीत पक्षनिष्ठा, स्थानिक नेतृत्व आणि राजकीय वर्चस्वाचीही कसोटी लागणार आहे. पुरुषोत्तम जगताप यांच्यासह त्यांच्या पॅनलमधील सदस्यांच्या हकालपट्टीचा मतदारांवर किती परिणाम होतो, हे निकालातून स्पष्ट होईल.
सुनेत्रा पवार यांच्या इशाऱ्यानंतर झालेली कारवाई, तीन पॅनलमधील चुरस आणि अजित पवार गटासमोर उभे राहिलेले आव्हान यामुळे बारामतीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आता सोमेश्वरच्या मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो आणि या कारवाईनंतर निवडणुकीचे चित्र कसे बदलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
