अवैध दारू विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला दोन वर्षांसाठी तडीपार; लोणी काळभोर पोलिसांची कारवाई…

लोणी काळभोर : लोणी काळभोर परिसरात देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करून परिसरातील कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला लोणी काळभोर पोलिसांनी दोन वर्षांसाठी तडीपार केले. अक्षय वामन जाधव (वय २५, रा. नांदे पाटील वस्ती, सिद्राम मळा, लोणी काळभोर) असे तडीपार करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार जाधव याच्याविरुद्ध देशी-विदेशी दारूची अवैध विक्री तसेच अन्य अवैध कृत्यांप्रकरणी यापूर्वी एकूण सात गुन्हे दाखल आहेत. वारंवार कारवाई करूनही त्याच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता.

अवैध दारूच्या व्यवसायामुळे परिसरातील नागरिकांमध्ये व्यसनाधीनता वाढण्यासह कुटुंबांवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तसेच या अवैध व्यवसायामुळे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने जाधव याला **पुणे शहर, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय तसेच पुणे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
पुणे शहरातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी अवैध दारूची विक्री, साठवणूक किंवा वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर प्रतिबंधात्मक व कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.


ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संजय दराडे, अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त जीवन बेनिवाल, सहायक पोलिस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप पवार, पोलिस निरीक्षक नंदकुमार कोळी, सहायक पोलिस निरीक्षक सतीश गोडसे यांच्यासह पोलिस अंमलदारां यांनी केली.
