लोणावळ्यात अभय मराठे मृत्यू प्रकरणात धक्कादायक खुलासा; आजोबांच्या रायफलमधून गोळीबार, खुनाचा गुन्हा दाखल

लोणावळा : लोणावळ्यातील भुशी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परवानाधारक 12 बोअर रायफलमधून गोळी झाडण्यात आल्याने 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृत तरुणाच्या 83 वर्षीय आजोबांसह कुटुंबातील पाच जणांविरोधात खुनासह पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे.
नेमकं काय घडलं?

मृत तरुणाचं नाव अभय माणिक मराठे (वय 32) असं आहे. सोमवारी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास भुशी गावाच्या हद्दीतील मोतीराम हॉटेलमध्ये ही घटना घडली. पोलिसांच्या फिर्यादीनुसार, 83 वर्षीय मोतीराम रावजी मराठे यांच्याकडे परवानाधारक 12 बोअर रायफल होती.


याच रायफलमधून गोळी झाडण्यात आली आणि त्यात अभय मराठे यांचा मृत्यू झाला. अभय यांच्या मृत्यूमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, अज्ञात कारणावरून अभय यांची हत्या केल्याचा आरोप पोलिसांच्या फिर्यादीत करण्यात आला आहे.
घटनेनंतर सीसीटीव्ही आणि डीव्हीआर गायब
या घटनेनंतर प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळालं. अभय यांच्या मृत्यूनंतर हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्याचं फुटेज असलेला डीव्हीआर काढून लपवण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अभय यांचे चुलते हिरामण मोतीराम मराठे, चुलत भाऊ मनोज हिरामण मराठे, कविता हिरामण मराठे आणि राजश्री दशरथ पवार यांनी संगनमत करून गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
पुरावा नष्ट केल्याचा आरोप
हॉटेलमधील सीसीटीव्ही यंत्रणा काढून लपवण्यात आल्याने घटनेशी संबंधित महत्त्वाचा इलेक्ट्रॉनिक पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचं पोलिसांच्या फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे.
या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 238, 241, 3(5) तसेच आर्म्स अॅक्टच्या कलम 3 आणि 27(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
12 बोअर रायफल पोलिसांकडून जप्त
या गुन्ह्यात वापरण्यात आलेली परवानाधारक 12 बोअर रायफल पोलिसांनी जप्त केली आहे. रायफलमधून नेमक्या कोणत्या परिस्थितीत गोळी झाडण्यात आली, गोळीबारामागील उद्देश काय होता आणि अभय यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
सोमवारी सकाळी ही घटना घडल्यानंतर मंगळवारी दुपारी 12 वाजून 4 मिनिटांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
आजोबांसह कुटुंबातील पाच जणांना अटक
या प्रकरणात मोतीराम रावजी मराठे, हिरामण मोतीराम मराठे, मनोज हिरामण मराठे, कविता हिरामण मराठे आणि राजश्री दशरथ पवार या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
एका कुटुंबातील 32 वर्षीय तरुणाचा रायफलमधून गोळी झाडून मृत्यू, त्यानंतर हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेरे आणि डीव्हीआर लपविल्याचा आरोप आणि आता आजोबांसह कुटुंबातील पाच जणांना अटक झाल्याने लोणावळ्यात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करत आहेत.
