सातारा जिल्हा बँकेत पहिला गुलाल! उदयनराजेंचा विजय बिनविरोध; विरोधकाने माघार घेताच समीकरणं बदलली


सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यात उधळला गेला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांची सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या विरोधात दाखल झालेला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर उदयनराजेंचा संचालकपदाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे निवडणुकीच्या सुरुवातीलाच साताऱ्यात महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे.

उदयनराजे यांनी गृहनिर्माण संस्था आणि दूध संस्थांच्या मतदारसंघातून संचालकपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात ज्ञानेश्वर पवार यांनी अर्ज भरला होता. मात्र, पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. छत्रपतींच्या गादीचा सन्मान आणि आदर म्हणून आपण ही माघार घेत असल्याचं ज्ञानेश्वर पवार यांनी स्पष्ट केलं. अर्ज मागे घेतल्यानंतर उदयनराजे समर्थकांनी जलमंदिर पॅलेस येथे त्यांचं बुके देऊन स्वागत केलं.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण २१ संचालक जागांसाठी निवडणूक होत आहे. यासाठी तब्बल २३६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर २२४ अर्ज वैध ठरले आहेत. अशा परिस्थितीत उदयनराजेंची बिनविरोध निवड होणं ही निवडणुकीतील पहिली मोठी घडामोड मानली जात आहे. पुढील काळात इतर जागांवरील निवडणुकीत कोण कोण मैदानात राहणार आणि कुठे माघारीचं राजकारण होणार, याकडे आता लक्ष लागलं आहे.

बिनविरोध निवडीनंतर उदयनराजे भोसले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सर्वसामान्यांच्या प्रगती आणि उत्कर्षासाठीच आपण निवडणुकीत अर्ज दाखल केला असल्याचं त्यांनी सांगितलं. सहकारी संस्थांमध्ये राजकारणाचा हस्तक्षेप वाढल्यामुळे अनेक संस्था अडचणीत आल्याचंही त्यांनी नमूद केलं. महाराष्ट्रातील विविध जिल्हे आणि तालुक्यांमध्ये अनेक सहकारी संस्था अवसायनात गेल्या असून, त्यामागे राजकारण हे प्रमुख कारण असल्याचं उदयनराजे म्हणाले.

सहकार चळवळ ही ‘लोकांनी, लोकांसाठी’ या तत्त्वावर सुरू झाली होती; मात्र या तत्त्वाचा विसर पडत चालल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपली वेगळी ओळख निर्माण केली असून, बँकेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामुळे इतर काही बँकांप्रमाणे सातारा जिल्हा बँकेची अवस्था होऊ नये, यासाठी काम करण्याचा आपला उद्देश असल्याचं उदयनराजेंनी सांगितलं.

शेतकरी, कष्टकरी आणि समाजातील उपेक्षित घटकांना बँकेच्या माध्यमातून अधिकाधिक सेवा मिळावी, अशी आपली भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. संचालकपद किंवा कोणत्याही पदाची वैयक्तिक अपेक्षा नसून सर्वसामान्य माणसाची प्रगती आणि उत्कर्ष हाच आपला उद्देश असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या निवडणुका पुढे ढकलण्याबाबतही उदयनराजेंना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर निवडणुका पुढे ढकलायच्या की नाही, हा निर्णय शासन पातळीवर घेतला जाणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता उर्वरित जागांवर निवडणूक कशी रंगते आणि साताऱ्यातील सहकाराच्या राजकारणात पुढील समीकरणं काय असतील, याची उत्सुकता वाढली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!