कर्ज फेडायचं होतं, म्हणून भावकीतील वृद्ध महिलांनाच केलं टार्गेट; बारामतीतील दुहेरी हत्याकांडाचा पर्दाफाश

बारामती : व्यसन आणि तमाशाच्या नादात कर्जबाजारी झालेल्या तरुणाने कर्ज फेडण्यासाठी आपल्या भावकीतीलच दोन वृद्ध महिलांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार सुपा परिसरातील शेरेवाडी येथे उघडकीस आला आहे. महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटण्यासाठी त्याने त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी विकास उर्फ अप्पा राजेंद्र लडकत (वय २५, रा. शेरेवाडी) याला अटक केली असून, त्याच्याकडून चोरीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
या घटनेत इंदुमती मारुती लडकत (वय ७५) आणि कृष्णाबाई कुंडलीक लडकत (वय ५५) यांचा मृत्यू झाला. दोन्ही महिला घराबाहेरील ओट्यावर झोपलेल्या असताना त्यांच्या अंगावरील सुमारे ६ लाख रुपये किमतीचे पाच तोळे सोन्याचे दागिने काढून घेण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

आठ पोलिस पथकांकडून तपास
या दुहेरी हत्याकांडामुळे शेरेवाडी परिसरात खळबळ उडाली होती. घटनेचा तपास करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी तब्बल आठ पथके तयार केली. घटनास्थळासह पंचक्रोशीतील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तसेच अहिल्यानगर, सोलापूर, सातारा, बीड, कोल्हापूर आणि कर्नाटकातील निपाणी येथेही पोलिसांची पथके रवाना करण्यात आली.


तपासादरम्यान अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या २०० हून अधिक रेकॉर्डवरील आरोपींची माहिती तपासण्यात आली. स्थानिक नागरिक आणि यापूर्वी गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींच्या हालचालींवरही पोलिसांनी लक्ष ठेवले. याचदरम्यान विकास लडकत याच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
चौकशीत हत्याकांडाचा उलगडा
पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर विकासने सोन्याच्या दागिन्यांसाठी दोन्ही महिलांचा खून केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून महिलांकडून लुटलेले सोन्याचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, व्यसन आणि तमाशाच्या नादामुळे विकास कर्जबाजारी झाला होता. कर्ज फेडण्यासाठी त्याला पैशांची गरज होती. त्यातूनच महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुटण्याचा प्रयत्न केल्याचे आणि त्यातून हे दुहेरी हत्याकांड घडल्याचे तपासात समोर आले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व शुभम कुमार, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शैलेश चिवडशेट्टी, सुपा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शशिकांत शेळके, महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, युवराज धोंडे, ज्ञानेश्वर राऊत, बाळासाहेब कारंडे, शिवाजी मुंढे, उदय पवार, कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
