स्मिता जाधवांना भाजपचं तिकीट, तरी शरद लाड मैदानात! ‘मला पक्षानेच सांगितलं’ म्हणत लाडांनी वाढवला सस्पेन्स; पडद्यामागे नेमकं काय?

पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवरून सुरू झालेला सस्पेन्स आता आणखी वाढला आहे. पक्षाने स्मिता योगेश जाधव यांच्या नावावर अधिकृत उमेदवारीची घोषणा केली असतानाच शरद लाड यांनी थेट विभागीय आयुक्त कार्यालय गाठत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली. विशेष म्हणजे पक्षाचं तिकीट मिळालेलं नसतानाही आपण अर्ज का भरत आहोत, यावर लाड यांनी दिलेल्या एका वाक्यामुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आलं आहे. ‘मला पक्षानेच अर्ज दाखल करायला सांगितलं आहे,’ असं त्यांनी पत्रकारांना सांगितलं.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये मोठ्या हालचाली सुरू होत्या. शरद लाड हे पुणे पदवीधर मतदारसंघासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. त्यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून निवडणुकीची जोरदार तयारी आणि मोर्चेबांधणी केली होती. त्यामुळे त्यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात असतानाच भाजपने ऐनवेळी वेगळा निर्णय घेत स्मिता जाधव यांना अधिकृत उमेदवारी दिली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण इच्छुकांच्या नावांची यादी घेऊन दिल्लीला गेले होते. त्यानंतर पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा आणि खलबतं झाल्यानंतर उमेदवारांची घोषणा करण्यात आली. नागपूर पदवीधर मतदारसंघातून सुधाकर कोहळे, पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे आणि पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे शरद लाड यांचा पत्ता कट झाल्याचं स्पष्ट झालं होतं.


मात्र, अधिकृत उमेदवारी हुकल्यानंतरही लाड यांनी अर्ज दाखल करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचल्याने भाजपच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पत्रकारांनी याबाबत विचारलं असता, ‘मला पक्षानेच अर्ज दाखल करायला सांगितलं आहे,’ एवढंच उत्तर त्यांनी दिलं. अर्ज भरल्यानंतर सर्व काही सविस्तर सांगणार असल्याचंही लाड यांनी स्पष्ट केलं.
त्यामुळे आता भाजपने एकाच मतदारसंघात दोन अर्ज का दाखल करण्याचा निर्णय घेतला, याची चर्चा सुरू झाली आहे. शरद लाड यांचा अर्ज हा पक्षाच्या संभाव्य ‘प्लॅन बी’चा भाग आहे का? एखाद्या तांत्रिक किंवा राजकीय परिस्थितीसाठी हा अर्ज सावधगिरी म्हणून भरला जातोय का? की स्मिता जाधव यांच्या उमेदवारीमागे आणि लाड यांच्या अर्जामागे पडद्यामागचं वेगळंच राजकीय गणित आहे? या प्रश्नांची उत्तरं अद्याप गुलदस्त्यात आहेत.
लाड यांनीही अर्ज दाखल झाल्यानंतरच भूमिका स्पष्ट करणार असल्याने सस्पेन्स कायम आहे. आता उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर नेमकं चित्र स्पष्ट होणार असून पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपच्या गोटात सुरू असलेल्या या नाट्यमय घडामोडींचा पुढचा टप्पा काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
