‘दादा नसताना ही सभा घ्यावी लागेल असं कधी वाटलंच नव्हतं’; जय पवार भावुक, सोमेश्वरच्या रणधुमाळीत नेमकं काय घडलं?

बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दिवसेंदिवस राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहेत. निवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा असतानाच स्वतंत्र पॅनल उभं राहिलं आणि पवार कुटुंबासमोर नवं आव्हान उभं ठाकलं. याच पार्श्वभूमीवर प्रचारसभेत जय पवार यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत केलेल्या भावनिक वक्तव्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
नाझरे सुपे येथे झालेल्या प्रचारसभेत जय पवार म्हणाले की, ‘दादा नसताना अशी प्रचारसभा घ्यावी लागेल, असं आयुष्यात कधीच वाटलं नव्हतं.’ अजित पवार यांनी आयुष्यभर सहकारी, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी आपुलकीचे संबंध जपले. त्यामुळे त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी सध्याची परिस्थिती समजून घेत दादांच्या कुटुंबासोबत उभं राहणं अपेक्षित होतं, अशी भावना जय पवार यांनी व्यक्त केली.

अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्यावर मोठी जबाबदारी आली. वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून त्यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आधार देत नेतृत्वाची धुरा स्वीकारली. त्यामुळे या काळात जुन्या सहकाऱ्यांनीही त्यांच्यासोबत उभं राहावं, अशी अपेक्षा जय पवार यांनी व्यक्त केली.


अजितदादांनी व्यक्तीविरोधाचं राजकारण न करता विकासाच्या मुद्द्यांवर राजकारण करण्याची शिकवण दिली, असं जय पवार यांनी सांगितलं. शेतकरी आणि सभासदांचं हित हेच केंद्रस्थानी असलं पाहिजे, या विचाराने आपण काम करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, सोमेश्वर कारखाना हा कोणत्याही एका व्यक्तीचा नसून हजारो सभासद आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टातून उभा राहिलेला सहकाराचा वारसा आहे, असं जय पवार यांनी सांगितलं. कारखान्याच्या विकासाला गती देणे, आर्थिक शिस्त राखणे आणि भविष्यातील स्पर्धेला सामोरं जाण्यासाठी कारखाना सक्षम करणं ही प्रमुख उद्दिष्टं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. स्वतःच्या व्यावसायिक अनुभवाचा दाखला देत आर्थिक शिस्त आणि योग्य नियोजनाचं महत्त्वही त्यांनी सांगितलं. आपल्या पॅनलला सभासदांनी साथ द्यावी, असं आवाहन त्यांनी केलं.
बिनविरोध निवडणुकीचं चित्र अचानक बदललं
सोमेश्वर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होईल, अशी सुरुवातीला चर्चा होती. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याची शक्यताही व्यक्त केली जात होती. मात्र, कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनल उभं करण्याचा निर्णय घेतला आणि समीकरणं बदलली.
जगताप यांनी भाजपच्या पाठिंब्याने ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनल’ची घोषणा केली. यामुळे सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससमोर थेट आव्हान उभं राहिलं. विशेष म्हणजे या पॅनलच्या नावात अजित पवारांचं नाव वापरण्यात आल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी विरोधकांनी अजितदादांचं नाव न वापरता निवडणूक लढवावी, असं आवाहन केलं.
यावर पुरुषोत्तम जगताप यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. आपण सभासद आणि कारखान्याच्या विकासासाठी स्वतंत्र पॅनल उभं केल्याचं सांगत त्यांनी अजितदादा हे महापुरुष असल्याचं म्हटलं. ‘सुनेत्राताई अजितदादांना सभासदांच्या मनातून आणि हृदयातून कशा बाहेर काढणार?’ असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे सोमेश्वरच्या निवडणुकीत आता भावनिक मुद्द्यांसोबतच राजकीय संघर्षही अधिक तीव्र होण्याची चिन्हं आहेत.
