खात्यात पैसे आले, पण शेतकऱ्यांची चिंता कायम! कर्जमाफीच्या तिसऱ्या हप्त्यानंतर समोर आली दुष्काळाची ‘ही’ धक्कादायक आकडेवारी

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एकाच वेळी दिलासा आणि चिंतेची बातमी समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा तिसरा हप्ता अखेर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने या हप्त्याचं वितरण करण्यात आलं. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बळीराजाला काहीसा आर्थिक आधार मिळाला आहे. मात्र, त्याचवेळी राज्यातील दुष्काळाची गंभीर आकडेवारी समोर आल्याने शेतकऱ्यांसमोरील संकट अजूनही कायम असल्याचं स्पष्ट होत आहे.
राज्यात यंदा पावसाअभावी शेतीसोबतच पशुधनावरही मोठा परिणाम झाला आहे. सध्या महाराष्ट्रात सुमारे २ कोटी ७८ लाख पशुधन आहे. या पशुधनासाठी १ हजार १७६.७८ लाख मेट्रिक टन हिरव्या चाऱ्याची गरज असताना केवळ ९०७.४९ लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. म्हणजेच तब्बल २६८.३७ लाख मेट्रिक टन हिरव्या चाऱ्याची कमतरता असून ही तूट २२.७९ टक्के आहे.

सुक्या चाऱ्याचं चित्रही फारसं वेगळं नाही. राज्याला ३७७.८७ लाख मेट्रिक टन सुक्या चाऱ्याची गरज आहे. त्यापैकी केवळ २९६.६२ लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. त्यामुळे ८१.०६ लाख मेट्रिक टन म्हणजेच २१.४३ टक्के तूट निर्माण झाली आहे. चाऱ्याच्या वाढत्या टंचाईमुळे पशुपालकांसमोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.


दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या जिल्ह्यांमध्ये सोलापूरचाही समावेश आहे. जिल्ह्यात सरासरीच्या केवळ ५० टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे जवळपास सर्वच खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. बार्शी आणि धनोर परिसरातील सुमारे ९० हजार हेक्टरवरील सोयाबीन पीक पूर्णपणे नष्ट झाल्याचं वृत्त आहे. पाण्याची उपलब्धता घटल्याने तलाव, जलाशय आणि इतर जलस्रोतांवरही परिणाम झाला आहे.
याचा फटका केवळ शेती आणि पशुपालनालाच बसलेला नाही. मत्स्य विभागानेही जलस्रोतांमधील घटत्या पाणीसाठ्यामुळे मत्स्यबीजांचं संवर्धन आणि उत्पादनाबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे दुष्काळाचा परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेतील अनेक घटकांवर होत असल्याचं चित्र आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वी राज्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचं सांगत आगामी काळ आव्हानात्मक असल्याचा इशारा दिला होता. परिस्थिती १९७२ च्या दुष्काळापेक्षाही गंभीर ठरू शकते, असंही त्यांनी म्हटलं होतं. या पार्श्वभूमीवर कर्जमाफीचा तिसरा हप्ता शेतकऱ्यांना दिलासा देणारा ठरला असला, तरी पिकांचं नुकसान, पाण्याची कमतरता आणि चाऱ्याची वाढती टंचाई यामुळे बळीराजासमोरचं संकट अद्याप टळलेलं नाही.
