टीव्ही बंद झाला अन् घरात वाद पेटला; काही वेळातच १७ वर्षीय लेकीचा मृत्यू, साताऱ्यात नेमकं काय घडलं?


सातारा : घरातील अगदी क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला वाद इतका टोकाला गेला की, एका १७ वर्षीय मुलीला जीव गमवावा लागला. साताऱ्यातील गोडोली परिसरातील स्वराज्यनगर येथे घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. आर्या पुरुषोत्तम कदम (वय १७) असे मृत मुलीचे नाव असून, तिच्या वडिलांनी रागाच्या भरात बॅटने तिच्या डोक्यात प्रहार केल्याची माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. या प्रकरणी वडील पुरुषोत्तम संपत कदम यांना अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे.

कदम दाम्पत्य दोघेही शिक्षक असून त्यांना १७ वर्षीय आर्यासह सहा वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांची मुलगी अशी तीन अपत्ये आहेत. शनिवारी रात्री घरातील लहान मुले जेवून झोपण्याच्या तयारीत असताना आर्या टीव्ही पाहत होती. त्याचवेळी लहान भावाने टीव्ही बंद केला. यावरून आर्याचा राग अनावर झाला आणि तिने भावाला मारहाण केल्याचे तपासात समोर आले आहे.

वाद वाढल्यानंतर परिस्थिती आणखी गंभीर झाली. आर्या वडिलांच्या दिशेने आधी चाकू घेऊन धावली आणि त्यानंतर बॅट घेऊन त्यांच्या अंगावर गेल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. यावेळी वडिलांनी तिच्या हातातील बॅट घेत तिच्या डोक्यात प्रहार केला. गंभीर दुखापतीनंतर आर्या घरातच कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर पोलिसांना माहिती देताना सुरुवातीला वेगळी माहिती देण्यात आल्याचेही काही वृत्तांत नमूद करण्यात आले आहे. घटनास्थळावरील परिस्थिती आणि कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीत विसंगती आढळल्यानंतर पोलिसांचा संशय बळावला. फॉरेन्सिक तपास आणि चौकशीनंतर वडिलांनी मुलीच्या डोक्यात बॅटने प्रहार केल्याची कबुली दिल्याचे वृत्त आहे. सातारा शहर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

आर्या अकरावीच्या वर्गात शिकत होती. तसेच उच्च रक्तदाबासाठी तिच्यावर उपचार सुरू होते. तिच्या वर्तनाबाबत कुटुंबात यापूर्वीही वाद होत असल्याची माहिती समोर आली असून, तिचे समुपदेशन आणि उपचार सुरू असल्याचेही काही वृत्तांत सांगण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी वडिलांशी झालेल्या वादात त्यांच्या हाताला दुखापत झाल्याची चर्चाही आहे.

दरम्यान, घटनेच्या रात्री आर्या टीव्ही पाहतानाच मित्राशी ‘स्नॅपचॅट’वर बोलत होती, अशी परिसरात चर्चा आहे. या बाबीची पोलिसांकडून पडताळणी सुरू असून त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. घटनेनंतर तिच्या पार्थिवावर रात्री उशिरा मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!