देशभरातील १९ जणांना गंडा, पावणेदोन कोटींची फसवणूक अन्… पुण्यातील ५ तरुणांचा कारनामा, पोलिसांकडून बेड्या


पुणे : ऑनलाइन फ्रॉड आणि सायबर गुन्ह्यांमधून मिळालेली फसवणुकीची रक्कम वळवण्यासाठी पुण्यातील तरुणांच्या बँक खात्यांचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘म्यूल अकाउंट्स’च्या माध्यमातून देशभरातील नागरिकांकडून लुटलेली रक्कम सुरक्षितपणे पुढे वळवणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा वानवडी पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने पर्दाफाश केला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह पाच जणांना अटक केली आहे. या टोळीने महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतील तब्बल १९ नागरिकांची सुमारे १ कोटी ८० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

देशभरातील फसवणुकीची रक्कम पुण्यातील खात्यांमध्ये

महाराष्ट्रासह विविध राज्यांतील नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करून मिळवलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम वळवण्यासाठी बनावट किंवा इतरांच्या नावाने वापरली जाणारी बँक खाती वापरली जात असल्याची माहिती महाराष्ट्र सायबर विभागाला मिळाली होती.

या माहितीच्या आधारे वानवडी पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान देशातील वेगवेगळ्या राज्यांतील नागरिकांकडून सायबर गुन्ह्यांद्वारे लुटलेली रक्कम पुण्यातील काही तरुणांच्या बँक खात्यांमध्ये जमा होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पाच जणांना अटक

या खात्यांचे नेटवर्क चालवणाऱ्या टोळीचा माग काढल्यानंतर वानवडी पोलिसांच्या पथकाने कारवाई करत पाच जणांना अटक केली.

श्रवण राजेंद्र अंकुशे (वय २५, रा. उरुळी देवाची), हरिओम हरिराम साहू (वय २४, रा. साळुंखे विहार, एनआयबीएम रस्ता), सौद इरफान शेख (वय २३, रा. येरवडा), साहिल रौफ शेख (वय २५, रा. येरवडा) आणि तालीब नूरमहम्मद शेख (वय २५, रा. मोहनवाडी, येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

आणखी किती सायबर गुन्ह्यांशी कनेक्शन?

या टोळीने आतापर्यंत आणखी किती सायबर गुन्हेगारांना म्यूल अकाउंट्स उपलब्ध करून दिली आहेत, या खात्यांमधून किती रक्कम वळवण्यात आली आणि या रॅकेटमागे आणखी कोणते सूत्रधार आहेत, याचा तपास वानवडी पोलीस करत आहेत. या प्रकरणामुळे सायबर फसवणुकीत वापरल्या जाणाऱ्या ‘म्यूल अकाउंट्स’च्या नेटवर्कचा गंभीर मुद्दा पुन्हा समोर आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!