बोरीपार्धीत गांजा तस्करीचा पर्दाफाश! स्विफ्ट डिझायरमधून 20 लाखांचा गांजा जप्त, हडपसरमधील दोघांना बेड्या

दौंड : यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरीपार्धी येथे स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला आहे. दत्त मंगल कार्यालयाजवळ सापळा रचून पोलिसांनी 25 लाख 50 हजार 900 रुपये किमतीचा एकूण 41 किलो 18 ग्रॅम गांजा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार जप्त केली. या प्रकरणी काळेपडळ, हडपसर येथे राहणाऱ्या दोन संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरोधात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हर्षवर्धन अशोक बरडे (वय 29, रा. काळेपडळ, हडपसर, मूळ रा. रायगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) आणि कुशाल दत्तात्रय बिनवडे (वय 30, रा. काळेपडळ, हडपसर, मूळ रा. वंजारवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार विकास कापरे यांनी फिर्याद दिली आहे.

कारमधून गांजाची वाहतूक होणार असल्याची माहिती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. 4) सायंकाळी पाचच्या सुमारास सुपा ते केडगाव चौफुला मार्गावरील बोरीपार्धी हद्दीत दत्त मंगल कार्यालयाजवळून एका कारमधून अमली पदार्थांची वाहतूक होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली.


माहिती मिळताच पोलीस हवालदार विकास कापरे आणि त्यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी सापळा रचला. काही वेळाने पिवळ्या नंबरप्लेटची पांढऱ्या रंगाची मारुती स्विफ्ट डिझायर कार तेथे आली. पोलिसांनी कार थांबवून तिची झाडाझडती घेतली.
दोन गोण्यांमध्ये 20 बंडल
कारची तपासणी केली असता नायलॉनच्या दोन गोण्यांमध्ये प्लास्टिकच्या चिकटपट्टीने गुंडाळलेली 20 बंडल आढळून आली. या बंडलमध्ये हिरवट-काळसर रंगाचा बिया, बोंडे आणि भुग्यासह गांजाचा साठा असल्याचे तपासणीत समोर आले.
दोन्ही गोण्यांमधून एकूण 41 किलो 18 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या गांजाची किंमत 20 लाख 50 हजार 900 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच कारचीही जप्ती करण्यात आली आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. पंचांसमक्ष गांजाचा साठा अधिकृतपणे सीलबंद करण्यात आला.
आंतरजिल्हा तस्करीचे कनेक्शन तपासणार
आर्थिक फायद्यासाठी कारचा वापर करून गांजाची बेकायदेशीर वाहतूक आणि विक्री केल्याचा आरोप दोन्ही संशयितांवर आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात NDPS कायद्यानुसार कारवाई केली आहे.
दरम्यान, या आंतरजिल्हा गांजा तस्करीमागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, गांजा नेमका कुठून आणला जात होता आणि या तस्करीचे जाळे कुठपर्यंत पसरले आहे, याचा तपास सुरू आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गाढवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास केला जात आहे.
