बी.जे.एस. महाविद्यालयात सायबर जनजागृती सत्र उत्साहात संपन्न..

वाघोली : वाढत्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरासोबतच सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही वाढत असून, विद्यार्थ्यांनी इंटरनेट आणि सोशल मीडियाचा सुरक्षित व जबाबदारीने वापर करणे आवश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर बी.जे.एस. महाविद्यालय, वाघोली येथे विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा आणि डिजिटल सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने Quick Heal Foundation यांच्या सहकार्याने सायबर जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमात महाविद्यालयातील सुमारे २०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सत्राचे सादरीकरण व मार्गदर्शन Prem Godse आणि Anushka Bhosale यांनी केले. विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात इंटरनेट, स्मार्टफोन, सोशल मीडिया तसेच ऑनलाइन व्यवहारांचा वापर करताना कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत सोप्या आणि प्रभावी पद्धतीने मार्गदर्शन करण्यात आले.

सत्रामध्ये सायबर गुन्ह्यांचे प्रकार आणि त्यापासून बचावाचे उपाय यावर विशेष भर देण्यात आला. ऑनलाइन फसवणूक, फिशिंग, बनावट वेबसाइट्स व लिंक, सोशल मीडिया अकाउंट हॅकिंग, ओळख चोरी, सायबर बुलिंग, OTP फसवणूक, बनावट कॉल व संदेश तसेच ऑनलाइन आर्थिक फसवणुकीच्या विविध पद्धतींबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.


सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांची वैयक्तिक व आर्थिक माहिती मिळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध युक्त्यांची उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर मांडण्यात आली. OTP, PIN, CVV, पासवर्ड, बँक खात्याची माहिती आणि वैयक्तिक कागदपत्रांची माहिती अनोळखी व्यक्तींना कधीही देऊ नये, असा महत्त्वपूर्ण संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. तसेच कोणतीही संशयास्पद लिंक उघडण्यापूर्वी तिची सत्यता तपासणे आणि सोशल मीडिया अकाउंटची गोपनीयता योग्य प्रकारे व्यवस्थापित करणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
याशिवाय विद्यार्थ्यांना मजबूत पासवर्ड वापरणे, Two-Factor Authentication सक्रिय करणे, सॉफ्टवेअर व मोबाइल अॅप्स अद्ययावत ठेवणे आणि सार्वजनिक Wi-Fi वापरताना आवश्यक ती खबरदारी घेणे यांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
विशेषतः ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास तातडीने सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा, तसेच उपलब्ध पुरावे जतन करून संबंधित यंत्रणेकडे तक्रार नोंदवावी, असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. सायबर गुन्ह्याची माहिती देताना वेळ न दवडणे महत्त्वाचे असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
सत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या प्रश्नांना उदाहरणांसह उत्तरे देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे ओळखणे, संभाव्य धोके टाळणे आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा सुरक्षित वापर करण्याबाबत व्यावहारिक माहिती मिळाली.
Quick Heal Foundation आणि बी.जे.एस. महाविद्यालय यांच्या संयुक्त पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या सायबर जनजागृती उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल सुरक्षिततेबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण झाली. आधुनिक डिजिटल युगात सुरक्षित, सजग आणि जबाबदार डिजिटल नागरिक घडविण्यासाठी अशा जनजागृतीपर उपक्रमांची आवश्यकता असल्याचे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.
