दिवेआगरच्या ८ विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर आळंदीत प्रशासनाचा मोठा दणका! ‘विनर्स अकॅडमी’ला ठोकले सील; परवान्याविना कारभाराचा ठपका

आळंदी : दिवेआगर समुद्रकिनारी सहलीला गेलेल्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर आळंदीतील वातावरण आधीच शोकाकुल असताना प्रशासनाने शुक्रवारी मोठी कारवाई केली. या दुर्घटनेशी संबंधित विनर्स अकॅडमीची इमारत आळंदी नगरपरिषदेने सील केली आहे. संस्थेकडे व्यावसायिक कामकाजासाठी आवश्यक वैध परवाना तसेच ना हरकत प्रमाणपत्र नसल्याचे कागदपत्रांच्या पडताळणीत आढळल्याचे नगरपरिषदेच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
गुरुवारी विनर्स अकॅडमीचे विद्यार्थी आणि शिक्षक असे एकूण ४८ जण रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनारी सहलीसाठी गेले होते. या पथकात २५ मुले, १७ मुली आणि सहा शिक्षकांचा समावेश होता. समुद्राच्या पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने १६ वर्षे वयोगटातील आठ विद्यार्थी खोल पाण्यात गेले. त्यानंतर समुद्राच्या लाटांच्या प्रवाहात ओढले गेल्याने या आठही विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला.

या दुर्घटनेनंतर आळंदी नगरपरिषदेने विनर्स अकॅडमीच्या कार्यालयीन कागदपत्रांची तपासणी केली. त्यावेळी अकॅडमीने व्यावसायिक स्वरूपाचे कामकाज सुरू करण्यासाठी नगरपरिषदेकडून कोणताही वैध परवाना घेतला नसल्याचे समोर आले. तसेच संस्थेकडे आवश्यक ना हरकत प्रमाणपत्रही नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे संस्था कोणतीही आवश्यक परवानगी न घेता सुरू असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्याचे आदेशात नमूद करण्यात आले.


महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियम, १९६५ अंतर्गत नगरपरिषदेने ही कारवाई केली. अकॅडमीची इमारत तातडीने सील करण्याचे आदेश देण्यात आले असून, संबंधित अधिकाऱ्यांना घटनास्थळी पंचनामा करून त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, आठ विद्यार्थ्यांचे पार्थिव आळंदीत पोहोचल्यानंतर संपूर्ण शहरावर शोककळा पसरली. शुक्रवारी सकाळपासून शेकडो नातेवाईक, मित्रपरिवार आणि स्थानिक नागरिकांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली. विद्यार्थ्यांच्या अकाली मृत्यूमुळे नागरिकांमध्ये हळहळ आणि संतापाचे वातावरण आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आळंदीतील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी शुक्रवारी कडकडीत बंद पाळल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
मृत विद्यार्थ्यांपैकी आणखी दोन विद्यार्थ्यांवर आळंदीतच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तर इतर दोन विद्यार्थ्यांचे पार्थिव अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी आणि अमरावती येथे नेण्यात येणार असून, तेथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
दिवेआगर दुर्घटनेने आठ कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना, आता विनर्स अकॅडमीच्या परवानग्यांचा मुद्दा समोर आला आहे. सहलीचे आयोजन, आवश्यक परवानग्या आणि नियमांचे पालन याबाबत प्रशासनाकडून पुढे कोणती कारवाई केली जाते, याकडे आळंदीकरांचे लक्ष लागले आहे.
