ऋषिकेश उद्धव ठाकरे… नावात थेट ‘ठाकरे’ची एन्ट्री! मतदार यादीतील महागोंधळ समोर


बीड : ‘ऋषिकेश उद्धव सुरवसे’ हे नाव मतदार यादीत चक्क ‘ऋषिकेश उद्धव ठाकरे’ झाल्याने मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या प्रारूप मतदार यादीतील घोळ समोर आला आहे. कुंभारी येथील ऋषिकेश सुरवसे यांच्या नावामागे ‘सुरवसे’ऐवजी ‘ठाकरे’ आल्याने त्यांनाही धक्का बसला. या चुकीमुळे मतदानाच्या वेळी अडचण निर्माण होण्याची भीती व्यक्त करत त्यांनी निवडणूक विभागाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला.

ही नोंद प्रारूप मतदार यादीतील अनुक्रमांक ४४८ वर होती. काही दिवसांपूर्वी मित्राने मतदार यादी पाठवल्यानंतर ऋषिकेश यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी निवडणूक अधिकारी डोके यांच्याशी चर्चा केली असता, नजरचुकीने ही त्रुटी झाल्याचे सांगण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, केवळ आपल्या नावातच नव्हे, तर इतर काही मतदारांच्या नावांमध्येही अशाच प्रकारे बदल झाल्याचे मित्रांकडून फोन करून सांगण्यात आल्याचे ऋषिकेश यांनी म्हटले.

या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत मतदार यादीचे पुन्हा पुनरीक्षण करावे, अशी मागणी ऋषिकेश यांनी केली. तसेच संध्याकाळी ७ वाजता निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेऊन या चुकीबाबत स्पष्टीकरण मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. ‘सुरवसे ते ठाकरे’ असा थेट बदल झाल्याने निवडणूक आयोगाने याचे उत्तर द्यावे आणि मतदारांची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.

पालवण येथील एका मतदाराच्या नावातही ‘ठाकरे’ आल्याचे त्यांनी सांगितले. हा प्रकार चुकून झाला की अन्य कारणामुळे, हे स्पष्ट व्हायला हवे, अशी भूमिका त्यांनी मांडली. मतदारसंख्या तुलनेने कमी असल्याने यादीतील प्रत्येक नावाची काळजीपूर्वक तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली.

दरम्यान, प्रकरण चर्चेत आल्यानंतर निवडणूक विभागाने तातडीने दुरुस्ती केली. बीडचे निवडणूक अधिकारी चंद्रकांत शेळके यांनी सांगितले की, ऋषिकेश उद्धव सुरवसे यांच्या नावाऐवजी ‘ऋषिकेश उद्धव ठाकरे’ अशी नोंद प्रारूप यादीत झाली होती. ही त्रुटी अंतिम यादीत दुरुस्त करण्यात आली असून आता संबंधित दुरुस्ती बाकी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे प्रारूप यादीतील या नावाच्या घोळावर अखेर पडदा पडला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!