पार्किंगचा वाद सोडवायला गेला अन् जीव गमावला; टेंभुर्णीत चाकूने वार, ४१ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू


टेंभुर्णी : गाडी पार्किंग करण्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचा चाकू हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना टेंभुर्णीतील नाळेवस्ती परिसरात घडली. नागनाथ मच्छिंद्र जाधव (४१, रा. वेणेगाव, ता. माढा) असे मृताचे नाव आहे. १ ऑक्टोबरला रात्री सव्वादहा वाजता ही घटना घडली.

नाळेवस्तीतील सद्दाम पटवारी यांच्या घरासमोरील पार्किंगच्या जागेवरून सद्दाम पटवारी आणि राज कदम यांच्यात वाद सुरू होता. भांडण सोडवण्यासाठी नागनाथ जाधव मध्ये पडले. त्याचा राग आल्याने संशयितांनी त्यांना शिवीगाळ करत जमिनीवर पाडले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर समाधान चौधरी आणि सागर कुटे यांनी आणलेल्या चाकूने नागनाथ यांच्या पाठीवर आणि मांडीवर वार केल्याचा आरोप आहे.

गंभीर जखमी नागनाथ यांना टेंभुर्णीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अकलूज येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान २ ऑक्टोबरला पहाटे त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात सद्दाम पटवारी हेदेखील जखमी झाले आहेत. घटनेनंतर आरोपी वाहनातून पसार झाल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणी मृत नागनाथ यांचे भाऊ महेश मच्छिंद्र जाधव (३९, रा. वेणेगाव) यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राज कदम, समाधान चौधरी, रणजीत पवार, सागर कुटे आणि दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून, पुढील तपास करमाळा विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा करत आहेत.

नागनाथ जाधव हे पिकअप वाहनचालक म्हणून काम करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, दोन मुले आणि आई-वडील असा परिवार आहे. भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या नागनाथ यांचा यात दुर्दैवी मृत्यू झाल्याने वेणेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. २ ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजता वेणेगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!