पुण्याची जागा भाजपच्या वाट्याला, तरी शिंदेंची वेगळी खेळी? मंगेश चिवटेंना अर्ज भरण्याच्या सूचना; महायुतीत नवा ट्विस्ट

पुणे : विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. पुणे शिक्षक आणि पुणे पदवीधर तसेच नागपूर पदवीधर या तीन जागा भाजप लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे अमरावतीची जागा शिवसेनेला, तर संभाजीनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. मात्र, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून आता महायुतीत वेगळाच ट्विस्ट निर्माण झाला आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून मंगेश चिवटे तयारी करत होते. उमेदवारी मिळावी यासाठी त्यांच्या भेटीगाठीही सुरू होत्या. चिवटे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे पुण्याची जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने त्यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

भाजपकडून संभाव्य उमेदवारांची यादी तयार


मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी विधान परिषद निवडणुकीतील संभाव्य उमेदवारांच्या नावांची यादी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे पाठवली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडे तीन जागांसाठी एकूण १५ संभाव्य नावांचा पर्याय देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. प्रत्येक जागेसाठी पाच नावांचा समावेश असल्याची माहिती आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघावर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकांकडून दावा केला जात होता. त्यामुळे या जागेवर कोणाचा उमेदवार असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. आता भाजप ही जागा लढवणार असल्याचे महायुतीतील चर्चेतून समोर येत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील इच्छुकांची समजूत काढण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता आहे.
मंगेश चिवटे काय करणार?
जागावाटपात पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपच्या वाट्याला जाणार असल्याचे सांगितले जात असतानाच मंगेश चिवटे यांच्याबाबतची माहिती या घडामोडींना वेगळे वळण देणारी ठरली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे यांनी चिवटे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले जात आहे.
त्यामुळे भाजपच्या वाट्याला गेलेल्या पुणे शिक्षक मतदारसंघातून चिवटे अर्ज दाखल करणार का, याकडे आता लक्ष लागले आहे. महायुतीचा जागावाटपाचा निर्णय आणि चिवटे यांची पुढील भूमिका यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र आणखी स्पष्ट होणार आहे. दरम्यान, ही माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली असून, अंतिम उमेदवारीबाबत पक्षांकडून अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.
