चार दिवस घरातून गायब, पोलादपूरच्या लॉजमध्ये वाहतूक पोलिसाची डेडबॉडी अन् चिट्ठीतून समोर आलं भयानक कांड

सातारा : वाई तालुक्यातील ओझर्डे येथील वाहतूक पोलीस संतोष रामचंद्र ननावरे (वय ३६) हे चार दिवसांपासून घरातून बेपत्ता होते. अखेर रायगड जिल्ह्यातील पोलादपूरमधील एका लॉजमध्ये त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी समोर आली. ननावरे यांच्या मृत्यूची माहिती मिळताच सातारा पोलीस दलात खळबळ उडाली. दरम्यान, घटनास्थळावर पोलिसांना ननावरे यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली असून, त्यातून कौटुंबिक वादाची माहिती समोर आली आहे.
ननावरे हे चार दिवसांपूर्वी घरातून निघून गेले होते. त्यांच्या बेपत्ता होण्याची तक्रार मात्र पोलीस ठाण्यात दाखल झाली नव्हती. या काळात ते मुंबई-गोवा महामार्गावरील काळकाई हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या जोगळे लॉजमध्ये थांबले होते. शुक्रवारी सकाळी लॉजमधील कर्मचारी त्यांच्या खोलीत आंघोळीसाठी पाणी देण्यासाठी गेला. त्याने दरवाजा ठोठावून हाका मारल्या, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे खिडकीची काच सरकवून पाहिले असता ननावरे मृतावस्थेत आढळले.

घटनेची माहिती मिळताच लॉज कर्मचाऱ्यांनी पोलादपूर पोलिसांना कळवले. पोलीस उपनिरीक्षक सतीश पवार पथकासह घटनास्थळी दाखल झाले. नातेवाईकांना माहिती देऊन बोलावण्यात आले. त्यानंतर खोलीचा दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढण्यात आला. महाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप काळे आणि पोलादपूरचे सहायक पोलीस निरीक्षक विजय सुर्वे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.


तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलेल्या चिठ्ठीत कौटुंबिक कलहाचा उल्लेख असल्याचे तपास अधिकारी सतीश पवार यांनी सांगितले. पत्नी नांदायला येत नसल्याने दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे त्यात नमूद असल्याचे पोलिसांनी सांगितले. पत्नीच्या आईच्या सांगण्यावरून पत्नी वाद घालत असल्याचा आरोपही चिठ्ठीत करण्यात आला आहे.
तसेच पत्नी, तिची बहीण आणि सासू यांना आपल्या मृत्यूसाठी जबाबदार धरत असल्याचे ननावरे यांनी चिठ्ठीत लिहिल्याची माहिती आहे. वारंवार पैशांची मागणी केली जात होती आणि पत्नीला घरात राहायचे नव्हते, असाही उल्लेख त्यात असल्याचे सांगण्यात आले आहे. या आरोपांची स्वतंत्र पडताळणी अद्याप झालेली नाही.
शवविच्छेदनानंतर ननावरे यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर मृतदेह ओझर्डे या मूळ गावी आणण्यात आला. रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलादपूर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, पोलीस उपनिरीक्षक सतीश पवार पुढील तपास करत आहेत.
