कोल्हापुरात वाईट घडलं! लेकीचं लग्न ठरलेलं, आई कामाला गेली अन् ओढणी अडकून गमावला जीव

कोल्हापूर : कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी यंत्रमाग कारखान्यात काम करणाऱ्या ३६ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. कांडी मशीनवर काम करत असताना ओढणी मशीनमध्ये अडकल्याने गळ्याला फास लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे खोतवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
आक्कुबाई महादेव पोवार (वय ३६, रा. खोतवाडी) असं मृत महिलेचं नाव आहे. शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी येथे ही दुर्दैवी घटना घडली.

नेमकं काय घडलं?
खोतवाडी येथे अनुल मुकरे यांचा साधा यंत्रमाग कारखाना आहे. आक्कुबाई पोवार गेल्या दोन वर्षांपासून या कारखान्यात काम करत होत्या. शुक्रवारी सकाळी त्या नेहमीप्रमाणे कामावर आल्या होत्या.


साडेनऊच्या सुमारास त्या कांडी मशीनवर कांडी भरण्याचं काम करत असताना त्यांच्या ड्रेसची ओढणी अचानक मशीनमध्ये अडकली. यामुळे त्यांच्या गळ्याला फास लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच दिवाणजी संतोष बेळगी यांनी पोलिसांत वर्दी दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शहापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
लेकीच्या लग्नाआधीच काळाचा घाला
आक्कुबाई पोवार यांच्या पश्चात दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. एका मुलीचं लग्न झालं असून दुसऱ्या मुलीचं लग्न ठरलं आहे. त्यांचा मुलगा शिक्षण घेत आहे. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी आक्कुबाई यांच्यावर होती.
मात्र, मुलीच्या लग्नाआधीच या दुर्दैवी घटनेने त्यांचं निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी मुलगा आणि मुलींचा आक्रोश पाहून उपस्थितांचंही मन हेलावलं. या घटनेमुळे संपूर्ण खोतवाडी गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
