‘दादा’ गेले अन् समीकरणं बदलली? सोमेश्वरच्या निवडणुकीत जगतापांच्या भूमिकेवरून धंगेकरांचा थेट सवाल; युगेंद्र पवारही मैदानात

बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीआधीच राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी घेतलेल्या स्वतंत्र भूमिकेवरून आता विरोधकांकडून जोरदार सवाल उपस्थित केले जात आहेत. माजी आमदार आणि शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांनी जगताप यांना उद्देशून लिहिलेल्या खुल्या पत्रामुळे या वादाला आणखी हवा मिळाली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनीही जगताप यांच्या भूमिकेवर गंभीर आरोप केले आहेत.
धंगेकर यांनी आपल्या पत्रातून जगताप यांच्या राजकीय वाटचालीचा दाखला देत थेट प्रश्न उपस्थित केला. अजित पवार यांनी जगताप यांना सलग १२ वर्षे सोमेश्वर कारखान्याचे चेअरमनपद दिले. कारखान्याच्या विस्तार आणि विकासात अजित पवार यांच्या नियोजनाचा मोठा वाटा होता, त्यामुळे त्यांच्या विश्वासाची आणि ऋणाची जाणीव ठेवणे अपेक्षित होते, असा दावा धंगेकर यांनी केला.

अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबीय कठीण परिस्थितीतून जात असताना सुनेत्रा पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी जगताप यांनी वेगळी भूमिका घेतल्याची टीका धंगेकर यांनी केली. ‘अजितदादा हयात असते तर त्यांच्या विचारांविरोधात जाण्याचे धाडस झाले असते का?’ असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.


याच पत्रातून धंगेकर यांनी जगताप यांना निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे आवाहन केले. वैयक्तिक स्वार्थ आणि हट्टासाठी सोमेश्वर कारखान्याचे वैभव पणाला लावू नका, अजूनही वेळ गेलेली नाही, असे म्हणत त्यांनी अजित पवार यांच्या अधिकृत पॅनेलसोबत उभे राहण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, युगेंद्र पवार यांनीही सोमेश्वर निवडणुकीवर भाष्य करताना जगताप यांच्या भूमिकेवर निशाणा साधला. जगताप भाजपच्या सहकार्याने निवडणूक लढवत असून, अजित पवार यांच्या नावाचा आणि छायाचित्राचा वापर करून भाजप सोमेश्वर कारखान्यात ‘मागच्या दाराने’ प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
युगेंद्र पवार यांच्या म्हणण्यानुसार, अजित पवार यांनीच जगताप यांना कारखान्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली होती. नेतृत्व करण्याची क्षमता असलेले इतर अनेक जण असतानाही जगताप यांना संधी देण्यात आली आणि ते सुमारे १२ वर्षे अध्यक्ष राहिले. कारखान्याच्या कारभारावर अजित पवार यांचे लक्ष असल्याचेही त्यांनी सांगितले.
पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
सोमेश्वर निवडणुकीत शरद पवार गटातील काही स्थानिक नेत्यांनी जगताप यांना पाठिंबा दिल्याबाबत युगेंद्र पवार यांना विचारण्यात आले. त्यावर, पक्षातील कोणी भाजपला पाठिंबा देऊन पक्षविरोधी काम केले असेल, तर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी याबाबत चर्चा झाली असून अशा पदाधिकाऱ्यांचे पद काढले जाईल, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पुरुषोत्तम जगताप यांच्या भूमिकेमुळे स्थानिक राजकारणात नवा संघर्ष उभा राहिला आहे. धंगेकरांचे खुले पत्र, युगेंद्र पवारांचे आरोप आणि जगतापांची स्वतंत्र भूमिका यामुळे निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापले आहे. आता या आरोपांना पुरुषोत्तम जगताप काय प्रत्युत्तर देतात आणि सभासदांचा कौल कोणाच्या बाजूने जातो, याकडे लक्ष लागले आहे.
