पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत तिढा; कोणाच्या वाट्याला जाणार जागा? महत्त्वाची अपडेट समोर

मुंबई : राज्यात विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेषतः पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या जागेवर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडून दावा करण्यात आल्याने जागावाटपाचा तिढा अद्याप कायम आहे.
महायुतीच्या जागावाटपाबाबत प्राथमिक सहमती झाल्याची माहिती समोर आली असली, तरी पुणे शिक्षक मतदारसंघाचा अंतिम निर्णय अद्याप स्पष्ट झालेला नाही. पुणे पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही जागांवर भाजपचा दावा असल्याचे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाकडूनही पुणे शिक्षक मतदारसंघासाठी उमेदवारीची मागणी करण्यात आली आहे.

या निवडणुकीत पुणे पदवीधर, पुणे शिक्षक, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर या पाच मतदारसंघांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर असून २३ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी २७ ऑक्टोबरला होणार आहे.


भाजपकडून बैठकांचे सत्र
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून बैठका आणि संघटनात्मक तयारीला वेग देण्यात आला आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्याची भूमिका भाजप नेत्यांकडून मांडण्यात आली आहे.
अमरावतीत मविआतही उमेदवारीवरून चर्चा
दुसरीकडे, अमरावती शिक्षक मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्येही उमेदवारीचा मुद्दा चर्चेत आला आहे. काँग्रेसकडून अदिती पोहरे यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. मात्र, या जागेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडूनही तयारी सुरू असल्याने मित्रपक्षांमध्ये समन्वयाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
आता पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा महायुतीतील कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाते आणि अंतिम उमेदवार कोण असतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ६ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने पुढील काही दिवसांत या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता आहे.
