बायको, मुलं, नेते की बदलीची ऑर्डर? तुकाराम मुंढेंना नेमकी कशाची भीती वाटते? स्वतःच दिलं उत्तर…


मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. त्यांच्या कारवाईमुळे कँटिन चालकांपासून हॉटेल व्यावसायिकांपर्यंत आणि छोट्या दुकानदारांपासून मोठ्या व्यावसायिकांपर्यंत अनेकांमध्ये धाक निर्माण झाला आहे. मात्र, आपल्या कडक भूमिकेसाठी ओळखले जाणारे तुकाराम मुंढे नेमके कुणाला घाबरतात? या प्रश्नाचे उत्तर खुद्द मुंढे यांनी दिले आहे.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात तुकाराम मुंढे यांना ‘तुम्ही कुणाला घाबरता? तुम्हाला कशाची भीती वाटते का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. ‘मला कशाचीही भीती वाटत नाही. मी कुणालाही घाबरत नाही,’ असं मुंढे यांनी सांगितलं.

‘तुम्हाला सर्वाधिक कोण घाबरतं?’

यानंतर मुंढे यांना आणखी एक मजेशीर प्रश्न विचारण्यात आला. ‘तुम्हाला सर्वाधिक कोण घाबरतं, अधिकारी की मुलं?’ असा सवाल करण्यात आला. त्यावर अधिकारी अधिक घाबरतात, असं त्यांनी मिश्कीलपणे सांगितलं. मात्र, ‘कधी कधी मीच मुलांना घाबरत असतो,’ असंही ते म्हणाले. त्यांच्या या उत्तरानंतर कार्यक्रमात हशा पिकला.

‘भीतीला डोक्यातून काढून टाका’

नेते, वरिष्ठ अधिकारी, पत्नी किंवा बदलीची ऑर्डर यापैकी कशाची भीती वाटते, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. त्यावर ‘मला कशाचीच भीती वाटत नाही. मी कुणाला घाबरत नाही. भीतीला डोक्यातून काढून टाका. तुम्ही काही चुकीचं केलं तरच तुम्हाला भीती वाटेल,’ असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं.

सरकारी अधिकाऱ्यांना दिला संदेश

यावेळी तुकाराम मुंढे यांनी सरकारी सेवेत असलेल्या अधिकाऱ्यांनाही महत्त्वाचा संदेश दिला. ‘सर्वात आधी तुम्ही तुमची भूमिका आणि जबाबदारी समजून घ्या. सरकारी नोकरीमध्ये उत्तरदायित्व सर्वाधिक असतं. कारण अधिकाऱ्यांना जनतेला थेट उत्तर द्यावं लागतं,’ असं त्यांनी सांगितलं.

सार्वजनिक समस्या समोर आल्यानंतर त्या सोडवणं ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. केवळ प्रशासन चालवणं एवढंच सरकारी अधिकाऱ्याचं काम नाही, तर लोकांना चांगल्या आणि सार्थक आयुष्याच्या दिशेने घेऊन जाण्याचीही जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

‘सरकारी नोकरीकडे केवळ पगाराच्या दृष्टीने पाहू नका’

सरकारी नोकरीकडे केवळ पगाराच्या दृष्टीने पाहू नका, असं आवाहनही त्यांनी केलं. सरकारी सेवा ही मोठी जबाबदारी असून समाजासाठी योगदान देण्याची संधी आहे. सरकारी नोकरीचा उद्देश केवळ नोकरी करणं नसून, जनतेच्या समस्या सोडवणं आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणं हा असायला हवा, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!