‘१० ते १२ महिलांच्या तक्रारी माझ्याकडे’; श्वेता महालेंचा इशारा, संजय गायकवाडांविरोधात पुढील आठवड्यात मोठी हालचाल?

बुलढाणा : आमदार संजय गायकवाड आणि भाजप आमदार श्वेता महाले यांच्यातील वाद आता नव्या वळणावर पोहोचला आहे. महिलांना माझ्या घरातून संदेश जात असल्याचा पुरावा द्या, असे आव्हान गायकवाड यांनी महालेंना दिले होते. हे आव्हान स्वीकारत महालेंनी आपल्याकडे १० ते १२ महिलांच्या तक्रारी आल्याचा दावा केला आहे. आणखी काही महिला तक्रार करण्यास इच्छुक आहेत; मात्र त्यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
महालेंच्या म्हणण्यानुसार, संबंधित महिलांना ‘कुठेही जाऊ नका, ज्यांनी संदेश पाठवले त्यांना आम्ही समज देऊ’, असे सांगितले जात आहे. त्यामुळे काही महिला पुढे येत नसल्याचा दावा त्यांनी केला. फेसबुक, इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटवरून महिलांना संदेश पाठवण्यात आल्याचेही महाले म्हणाल्या. समाजात राहायचे असल्याने नाव उघड होऊ नये, अशी या महिलांची मागणी असून, त्यांची गोपनीयता राखण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणाची माहिती घेऊन पुढील आठवड्यात डीआयजींची भेट घेणार असल्याचे महालेंनी स्पष्ट केले. चौकशी झाल्यानंतर नेमकी वस्तुस्थिती समोर येईल, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, शिवसेनेच्या महिला आघाडीने आपल्याविरोधात दिलेले निवेदनही नेत्यांच्या दबावामुळे असल्याचा दावा महालेंनी केला. निवेदन देणाऱ्या काही महिलांनी आपल्याशी बोलताना मूळतः आपल्या नेत्यांविरोधात निवेदन देण्याची इच्छा असल्याचे सांगितले होते, मात्र दबावामुळे आपल्याविरोधात निवेदन द्यावे लागल्याचे त्यांनी सांगितल्याचा दावा महालेंनी केला.


चिखलीचा ‘गाझियाबाद’ झाल्याच्या गायकवाडांच्या वक्तव्यावरही महालेंनी पलटवार केला. चिखलीची परिस्थिती कशी आहे, हे तेथील जनताच सांगेल. चिखली सुसंस्कृत असून, येथे दारू पिऊन भररस्त्यात शिवीगाळ करण्याची संस्कृती नाही, असे त्या म्हणाल्या. तसेच बुलढाण्यातील अवैध धंद्यांशी संबंधित लोकच मोर्चात सहभागी होऊन अवैध धंदे बंद करण्याची मागणी करत असल्याचा दावाही त्यांनी केला. महालेंचे हे आरोप आणि दावे स्वतंत्रपणे सिद्ध झालेले नाहीत. आता डीआयजींकडे त्या कोणती माहिती किंवा पुरावे सादर करतात, याकडे लक्ष लागले आहे.
