क्लास सुटला अन् १३ वर्षीय मुलीचा पाठलाग सुरू झाला! ६ जणांनी पडक्या इमारतीत नेलं; महिनाभर दडलेलं प्रकरण उघड, तिघांना अटक


फरीदाबाद : हरियाणातील ग्रेटर फरीदाबाद परिसरात १३ वर्षीय मुलीवरील सामूहिक अत्याचाराच्या आरोपाने खळबळ उडाली आहे. क्लासवरून घरी जात असताना एका १३ वर्षीय मुलीचा आणि तिच्या १६ वर्षीय मैत्रिणीचा सहा जणांनी पाठलाग केल्याचा आरोप आहे. त्यानंतर दोघींना एका पडक्या इमारतीत नेऊन धमकावण्यात आले. याठिकाणी १३ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची तक्रार आहे, तर तिच्या १६ वर्षीय मैत्रिणीसोबतही गैरवर्तन केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

ही घटना २४ ऑगस्ट रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. आठवीत शिकणारी पीडित मुलगी क्लास संपल्यानंतर घरी परतत होती. वाटेत ती आपल्या १६ वर्षीय मैत्रिणीला भेटली. दोघी एकत्र असताना सहा जणांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना एका पडक्या इमारतीत नेल्याचा आरोप आहे. तेथे आरोपींनी दोन्ही मुलींना धमकावले. जिवे मारण्याची भीती दाखवून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

घटनेनंतर दोन्ही मुली घाबरल्यामुळे त्यांनी सुरुवातीला हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला नाही. मात्र, काही दिवसांनी १३ वर्षीय मुलीच्या वागण्यात बदल जाणवू लागला. आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली.

२९ सप्टेंबर रोजी बीपीटीपी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तक्रारीनंतर मुलीची वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर सामूहिक बलात्कार आणि लैंगिक छळाशी संबंधित विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान पोलिसांनी कुणाल, दीपक आणि यश या तीन आरोपींना अटक केली. गुरुवारी रात्री त्यांना स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, या प्रकरणात एकूण सहा जणांचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. त्यापैकी तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून उर्वरित तीन आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!