२ ऑक्टोबरला महाराष्ट्रात UPI पेमेंट बंद? व्यापारी फक्त कॅश स्वीकारणार; नेमकं कारण काय?


मुंबई : डिजिटल पेमेंटचे प्रमुख माध्यम असलेल्या UPI व्यवहारांवरील MDRच्या मुद्द्यावरून राज्यातील व्यापारी वर्ग आक्रमक झाला आहे. MDRच्या माध्यमातून व्यापाऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचा आरोप करत, त्याविरोधात सामूहिक भूमिका मांडण्यासाठी २ ऑक्टोबर रोजी राज्यभर ‘NO UPI – NO PAYMENT’ मोहीम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन बैठकीत राज्यातील विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या मोहिमेचा निर्णय घेतला. महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

UPIला विरोध नाही, MDRला आक्षेप

UPI हे डिजिटल पेमेंटचे महत्त्वाचे माध्यम असून, चेंबरचा UPIच्या वापराला किंवा डिजिटल व्यवहारांना विरोध नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. मात्र, UPI व्यवहारांवर आकारल्या जाणाऱ्या MDRमुळे लहान-मोठ्या व्यापाऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचे व्यापारी संघटनांचे म्हणणे आहे.

हा आर्थिक भार व्यापाऱ्यांवर टाकला जाऊ नये आणि UPI व्यवहारांवर ‘Zero MDR’ धोरण कायम ठेवावे, ही व्यापारी वर्गाची प्रमुख मागणी आहे.

२ ऑक्टोबरला व्यापारी काय करणार?

२ ऑक्टोबर रोजी राज्यातील व्यापाऱ्यांनी UPI पेमेंट स्वीकारू नये आणि केवळ रोख व्यवहार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच सोशल मीडियाच्या माध्यमातूनही या मोहिमेला पाठिंबा देण्यात येणार आहे.

व्यापारी WhatsApp DP, Facebook, Instagram Story आणि Statusवर ‘NO UPI – NO PAYMENT | ZERO MDR’ असा संदेश ठेवून आपली भूमिका मांडणार आहेत.

‘एक दिवस, एक भूमिका, एकजूट’

‘एक दिवस, एक भूमिका, एकजूट – NO UPI – NO PAYMENT’ या सूत्राखाली राज्यातील लहान-मोठ्या दुकानदारांनी आणि व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

२ ऑक्टोबरची ही मोहीम कोणालाही अडचणीत आणण्यासाठी नसून, व्यापाऱ्यांवर पडणारा अतिरिक्त आर्थिक भार रोखण्यासाठी शांततापूर्ण पद्धतीने सामूहिक भूमिका मांडण्याचा प्रयत्न असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!