दिवेआगरच्या समुद्रात सहलीला काळाचा घाला; आळंदीच्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू, ४४ जणांच्या सहलीत शोककळा

रायगड : सहलीचा आनंद घेण्यासाठी दिवेआगरच्या समुद्रकिनारी पोहोचलेल्या आळंदीतील विद्यार्थ्यांच्या समूहावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. समुद्राच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने पाण्यात उतरलेले आठ विद्यार्थी बुडाले. या दुर्घटनेत आठही विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, सर्व मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले आहेत. पोलिसांनीही या घटनेची पुष्टी केली आहे.
पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील खासगी शिकवणी वर्गातून विद्यार्थी दिवेआगरला सहलीसाठी आले होते. उपलब्ध माहितीनुसार, ४८ जणांचा हा समूह होता. त्यात २५ मुले, १७ मुली आणि सहा शिक्षकांचा समावेश होता. समुद्रकिनारी पोहोचल्यानंतर काही विद्यार्थी पाण्यात उतरले. मात्र लाटांचा प्रवाह आणि पाण्याची खोली यांचा अंदाज चुकल्याने ते खोल पाण्यात वाहून गेले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि महाकाली वॉटर स्पोर्ट्सच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने समुद्रात शोधमोहीम सुरू केली. बचावकार्यादरम्यान सर्व आठ विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मृतदेह बोर्ली पंचतन प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले असून, पुढील कायदेशीर आणि वैद्यकीय प्रक्रिया सुरू आहे.


दरम्यान, दुर्घटनेनंतर दिघी सागरी पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. दिवेआगरच्या समुद्रकिनारी घडलेल्या या दुर्घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेतली. बचाव व मदतकार्यावर तातडीने लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांप्रती त्यांनी दुःख व्यक्त केले असून, आवश्यक ती मदत आणि कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.
