आधी पाठलाग; मग लग्नाची पत्रिका द्यायला घरात आली, ओढणीत दागिने बांधले अन्… ७० वर्षीय महिलेसोबत भयंकर कांड

मुंबई : मुंबईतून एक विचित्र आणि धक्कादायक फसवणुकीची घटना समोर आली आहे. अँटॉप हिल परिसरात एका ७० वर्षीय महिलेची मंत्रजपाच्या बहाण्याने फसवणूक करत एका भामट्या तरुणीने सोन्याचे मंगळसूत्र आणि कानातील दागिने लंपास केले. या प्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे.
कुलसुमबी काझी (वय ७०) या अँटॉप हिल परिसरात कुटुंबासह राहतात. रविवारी सायंकाळी त्या दूध घेऊन घरी परतत असताना एका अनोळखी तरुणीने त्यांचा पाठलाग केला. कुलसुमबी यांनी तिच्याकडे विचारणा केली असता ती काहीही न बोलता निघून गेली. मात्र, काही वेळाने हीच तरुणी थेट त्यांच्या घरात पोहोचली.

‘मी शेजारच्या चाळीत राहते. बहिणीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आले आहे,’ असे सांगून तिने कुलसुमबी यांचा विश्वास संपादन केला. घरात बसल्यानंतर तिने त्यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. ‘तुमची तब्येत ठीक दिसत नाही. मला मंत्रजपाच्या माध्यमातून आजार बरा करता येतो,’ असे सांगत तिने वृद्ध महिलेची दिशाभूल केली.


त्यानंतर मंत्रजप करण्याच्या बहाण्याने तिने कुलसुमबी यांचे सोन्याचे मंगळसूत्र आणि दोन्ही कानांतील सोन्याचे दागिने काढून घेतले. त्यानंतर घरातील तांदूळ आणून त्या दागिन्यांवर ठेवले आणि काही मंत्र पुटपुटत असल्याचे नाटक केले. सर्व दागिने एका ओढणीत बांधून तिने कुलसुमबी यांना दिले.
‘दोन-तीन तासांत तुम्हाला आजारपणातून फरक जाणवेल. तोपर्यंत ही ओढणी उघडू नका. मी पुन्हा येते,’ असे सांगून तरुणी घरातून निघून गेली.
मात्र, अनेक तास उलटूनही ती परत आली नाही. संशय आल्याने कुलसुमबी यांनी ओढणी उघडून पाहिली असता त्यामध्ये दागिने नव्हते. परिसरात शोध घेऊनही तरुणीचा ठावठिकाणा लागला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
अँटॉप हिल पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयित तरुणीचा शोध घेत आहेत.
दरम्यान, मानखुर्द परिसरातही गेल्या महिन्यात एका ६५ वर्षीय वृद्ध महिलेसोबत अशाच पद्धतीने फसवणूक झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे अँटॉप हिलमधील या घटनेचा आणि मानखुर्दमधील प्रकरणाचा काही संबंध आहे का, याचा तपासही पोलीस करत आहेत.
