काँग्रेसचा अमरावतीत नवा डाव; अदिती पोहरे मैदानात, शिक्षकांच्या प्रश्नांपासून राजकीय पार्श्वभूमीपर्यंत सगळं चर्चेत


अमरावती : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसने प्रा. अदिती ऋषिकेश पोहरे यांना उमेदवारी दिल्याने या मतदारसंघातील समीकरणांकडे लक्ष लागले आहे. पक्षप्रवेशानंतरच त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली. टिळक भवन येथे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी डॉ. सिरीवेला प्रसाद आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला. यावेळी यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली.

अदिती पोहरे या अभियांत्रिकी क्षेत्रातील प्राध्यापक आहेत. त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये पदवी, संरचनात्मक रचना विषयात पदव्युत्तर पदवी आणि मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात अध्यापनाचा अनुभवही त्यांना आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीचीही चर्चा होत आहे.

त्यांची राजकीय आणि सामाजिक पार्श्वभूमीही लक्षवेधी आहे. अदिती पोहरे या माजी मंत्री हर्षवर्धन उर्फ भैय्यासाहेब देशमुख यांच्या कन्या आहेत. देशमुख हे श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि मोर्शीचे माजी आमदार राहिले आहेत. त्यांचे सासरे प्रकाश पोहरे हे ‘देशोन्नती’चे संस्थापक-संपादक असून शेतकरी चळवळीशी संबंधित आहेत. पोहरे कुटुंबाचे संजय धोत्रे आणि रणधीर सावरकर यांच्या कुटुंबाशीही संबंध आहेत.

अमरावती शिक्षक मतदारसंघात अमरावतीसह अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यांचा समावेश आहे. या मतदारसंघात पूर्वी शिक्षक संघटनांचा प्रभाव मोठा होता; मात्र गेल्या काही निवडणुकांपासून राजकीय पक्षांचा थेट सहभाग वाढला आहे. २०२० मध्ये अपक्ष किरण सरनाईक यांनी प्रा. श्रीकांत देशपांडे यांचा पराभव केला होता. सरनाईक नंतर शिंदे गटात गेले असून देशपांडेही याच गटात आहेत.

दरम्यान, महायुतीच्या जागावाटपात अमरावती शिक्षक मतदारसंघ शिंदे गटाला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अधिकृत उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. शिंदे गटाकडून विद्यमान आमदार किरण सरनाईक आणि माजी आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे इच्छुक आहेत. देशपांडे यांनी उमेदवारीसाठी दोन अर्ज दाखल केले असून, पक्षाची उमेदवारी न मिळाल्यास शिक्षक आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. भाजपकडून संगीता शिंदे आणि चंद्रशेखर भोयर यांचीही नावे चर्चेत आहेत.

दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने प्रा. डी. एस. लहाने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेसकडून अदिती पोहरे, ठाकरे गटाचे लहाने आणि महायुतीचा संभाव्य उमेदवार अशी बहुकोनी लढत उभी राहण्याची शक्यता आहे. शिक्षकांसाठी जुनी पेन्शन योजना, रिक्त पदांची भरती आणि शिक्षण क्षेत्रातील विविध प्रलंबित प्रश्न हे निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे ठरणार आहेत.

विशेष म्हणजे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अदिती पोहरे यांनी शिक्षकांशी संवाद सुरू केला आहे. २९ सप्टेंबरला मलकापूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या बैठकीत अशैक्षणिक कामांचा वाढता भार, जुनी पेन्शन योजना, संचमान्यता, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन, रिक्त पदांची भरती, पवित्र पोर्टल, शालार्थ आयडी, वेतनातील विलंब आणि विनाअनुदानित शिक्षण संस्थांच्या प्रश्नांवर चर्चा झाली. शिक्षकांना सर्वेक्षण, निवडणूक कामकाज, एसआयआर ड्युटी आणि डिजिटल माहिती संकलनासारख्या कामांचा अतिरिक्त ताण येत असल्याने स्वतंत्र डेटा एंट्री ऑपरेटरची व्यवस्था करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

या निवडणुकीसाठी २९ सप्टेंबरला अधिसूचना जारी झाली आहे. ६ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असून ७ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार आहे. ९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी मागे घेता येईल. २३ ऑक्टोबरला सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार असून २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आता उर्वरित उमेदवार कोण असतील आणि अंतिम रिंगण कसे तयार होईल, याकडे अमरावती विभागातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!