अजित पवारांच्या फोटोवरून सोमेश्वरच्या रणांगणात नवा ट्विस्ट! बॅनर काढला, जगताप म्हणाले- ‘दादा फोटोमध्ये नाही, हृदयात आहेत’

बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अंतिम टप्प्यात अजित पवारांच्या नाव आणि छायाचित्रावरून नवा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. पुरुषोत्तम जगताप यांनी स्वतंत्र पॅनेल उभं करत वाणेवाडी येथे मेळावा घेतला होता. या मेळाव्यात दिवंगत अजित पवारांचा फोटो असलेला बॅनर लावण्यात आला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामती तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी अजित पवार यांच्या कुटुंबीयांची परवानगी घेतल्याशिवाय त्यांचा फोटो किंवा नाव निवडणूक प्रचारात वापरू नये, असं आवाहन केलं. त्यानंतर मेळाव्यातील बॅनर हटवण्यात आला.
बॅनर हटवल्यानंतर पुरुषोत्तम जगताप यांनी या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. ‘अजितदादा सभासदांच्या मनात आहेत, अजितदादा आमच्या हृदयात आहेत. त्यामुळे फोटो लावला किंवा नाही लावला, यामुळे काही फरक पडणार नाही,’ असं जगताप यांनी म्हटलं. त्यामुळे फोटो हटवल्यानंतरही जगताप यांच्या पॅनेलच्या नावात मात्र अजित पवारांचं नाव कायम असल्याचं चित्र आहे. त्यांच्या पॅनेलचं नाव ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेल’ आहे.

दरम्यान, पुरुषोत्तम जगताप यांनी राष्ट्रवादीपासून स्वतंत्र भूमिका घेतल्याने सोमेश्वर कारखाना निवडणुकीत आता तिरंगी लढतीचं चित्र स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’ मैदानात आहे. या पॅनेलला शिंदे गटाच्या शिवसेनेची साथ आहे. दुसरीकडे युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं पॅनेल निवडणूक लढवत आहे. तर पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपच्या साथीनं स्वतंत्र पॅनेल उभं केलं आहे.


या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अजित पवार यांच्या निधनानंतर सोमेश्वर कारखान्याची ही पहिली निवडणूक होत आहे. त्यामुळे बारामतीच्या सहकार क्षेत्रातील या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागलं आहे. पुरुषोत्तम जगताप यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत मतभेदही समोर आले आहेत. मात्र, जगताप यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाणार नसल्याचं जय पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
६०१ अर्ज, ४३१ माघारी; आता ८३ उमेदवार
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सुरुवातीला तब्बल ६०१ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर ५१४ अर्ज पात्र ठरले. ३० सप्टेंबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती. या मुदतीत तब्बल ४३१ उमेदवारांनी माघार घेतल्याने आता ८३ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. त्यामुळे तीन पॅनेल, पुरुषोत्तम जगतापांची बंडखोरी आणि अजित पवारांच्या नाव-फोटोचा मुद्दा यामुळे सोमेश्वरच्या निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे.
