MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश! फडणवीसांच्या बैठकीनंतर 2 ऑक्टोबरचं आंदोलन स्थगित; ऑफलाईन परीक्षा होणार, सचिवांच्या बदलीसह 3 महिन्यांत चौकशीचं आश्वासन

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आणि भरती प्रक्रियेतील विविध प्रश्नांवरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांना आता महत्त्वाचं वळण मिळालं आहे. आंदोलक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत विद्यार्थ्यांनी परीक्षा पद्धतीपासून ते आयोगातील अधिकाऱ्यांच्या कामकाजापर्यंत अनेक मुद्दे मांडले. चर्चेनंतर सरकारकडून विविध मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.
बैठकीनंतर विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे एमपीएससीच्या परीक्षा पद्धतीतील बदल. यापुढे आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा ऑनलाइन पद्धतीऐवजी ऑफलाइन पद्धतीने घेण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षा पद्धतीबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर चौकशी


एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवरही बैठकीत चर्चा झाली. अध्यक्षांच्या राजीनाम्याबाबत न्यायाधीशांमार्फत पुढील तीन महिन्यांत न्यायालयीन चौकशी केली जाणार असल्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या पुढील चौकशीकडे विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं आहे.
यासोबतच एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीबाबतही सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. आयोगातील काही अधिकाऱ्यांच्या कामकाजाचीही पुढील तीन महिन्यांत चौकशी केली जाणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाकडून देण्यात आली.
स्पर्धा परीक्षांसाठी सिंगल कार्ड यंत्रणा
स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांसाठी नवीन यंत्रणा विकसित करण्याचाही निर्णय बैठकीत चर्चिला गेला. सिंगल कार्ड यंत्रणा तयार करण्याचं आश्वासन देण्यात आलं असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध परीक्षांच्या प्रक्रियेत आवश्यक असलेली कागदपत्रे आणि ओळख प्रक्रियेबाबत सुलभता मिळण्याची अपेक्षा आहे.
रिक्त पदांच्या भरतीबाबतही मोठं आश्वासन
राज्यातील विविध विभागांमध्ये प्रलंबित असलेली तसेच रिक्त असलेली पदं लवकरात लवकर भरण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलं आहे. त्यामुळे सरकारी भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या स्पर्धा परीक्षा उमेदवारांचं लक्ष आता आगामी भरती प्रक्रियेकडे लागलं आहे.
2 ऑक्टोबरचं आंदोलन स्थगित
मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत विविध मागण्यांबाबत सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या पार्श्वभूमीवर 2 ऑक्टोबर रोजी पुण्यात प्रस्तावित करण्यात आलेलं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे.
आता बैठकीत देण्यात आलेल्या आश्वासनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होते, एमपीएससी सचिवांच्या बदलीबाबत अंतिम निर्णय काय होतो, तीन महिन्यांची चौकशी कशी पार पडते आणि रिक्त पदांच्या भरतीला प्रत्यक्ष सुरुवात कधी होते, याकडे राज्यातील स्पर्धा परीक्षा उमेदवारांचं लक्ष लागलं आहे.
