मनोज जरांगे पाटील अडचणीत? नवनाथ वाघमारेंचा गंभीर आरोप; ‘आरक्षणाच्या नावाखाली मराठा समाजाची फसवणूक’

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसल्यानंतर राज्याच्या राजकारणात आणि सामाजिक वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली होती. अंतरवाली सराटी येथे उपोषण केल्यानंतर मागण्यांवर तातडीने तोडगा निघाला नाही. त्यामुळे जरांगे यांनी मुंबईच्या दिशेने आंदोलनासाठी निघण्याची घोषणा केली. त्यानंतर ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले; मात्र वाटेतच त्यांची प्रकृती बिघडल्याने आंदोलन मागे घेण्यात आलं.
सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आंदोलन स्थगित केलं. त्यानंतर आरक्षणासंदर्भातील मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारला तीन महिन्यांची मुदत देण्यात आल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं. मात्र, आता ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी याच मुदतीवर प्रश्न उपस्थित करत वेगळाच दावा केला आहे.

‘सरकारने एक वर्षाची मुदत घेतली’


नवनाथ वाघमारे यांच्या दाव्यानुसार, सरकारने जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर कार्यवाही करण्यासाठी तीन महिने नव्हे, तर एक वर्षाची मुदत घेतली आहे. त्यामुळे तीन महिन्यांची मुदत असल्याचं सांगून मराठा समाजाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप वाघमारे यांनी केला. त्यांच्या या दाव्यामुळे सरकार आणि जरांगे यांच्यात नेमकं काय ठरलं, यावर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरही जोरदार टीका केली. जरांगे यांनी काही माफियांना पोसून मोठं केल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता लक्षात आल्यानंतर जरांगे पाटोद्यातून पळून आल्याचा दावाही त्यांनी केला.
‘आरक्षणाच्या नावाखाली मराठा समाजाची फसवणूक’
‘जरांगे हे मोठे नौटंकीबाज आहेत. नौटंकी करण्यासाठीच ते रुग्णालयात दाखल झाले होते,’ असा गंभीर आरोप नवनाथ वाघमारे यांनी केला. आरक्षणाच्या नावाखाली जरांगे यांनी मराठा समाजाची फसवणूक केल्याचंही ते म्हणाले. तसेच राजकीय नेत्यांकडून रसद घेऊन आंदोलन केल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, जरांगे यांच्या समर्थकांकडून महिलांना केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगच्या मुद्द्यावरूनही वाघमारे यांनी आक्षेप घेतला. ‘माता-माऊल्यांना किती ट्रोल करायचं, याचं भान जरांगे यांच्या समर्थकांना असायला हवं. महिलांना गलिच्छ बोलणारे शिवरायांचे मावळे कसे असू शकतात?’ असा सवाल त्यांनी केला.
‘जरांगेंच्या आसपास माफियांची टोळी’
मनोज जरांगे पाटील यांच्या आसपास आता केवळ माफियांची टोळी उरल्याचा दावाही वाघमारे यांनी केला. ललिता तारख यांना ट्रोल करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, जरांगे यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे त्यांनी डिफेंडर गाडी परत केली, असंही वाघमारे यांनी म्हटलं.
नवनाथ वाघमारे यांच्या या वक्तव्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनावरून पुन्हा आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. सरकारने जरांगे पाटील यांना नेमकी किती मुदत दिली, याबाबत अधिकृत माहिती किंवा कागदपत्रे समोर आल्यास या दाव्यांबाबत अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे. सध्या मात्र वाघमारे यांनी केलेल्या दाव्यांवरून आरक्षणाच्या मुद्द्यावर नवी चर्चा सुरू झाली आहे.
