‘बैठकीत असताना मूग गिळून का बसलात?’; डिंभे-माणिकडोह बोगद्यावरून राम शिंदेंचा रोहित पवारांना थेट सवाल


अहिल्यानगर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून अहिल्यानगरच्या राजकारणात आधीच आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आता डिंभे-माणिकडोह बोगदा प्रकल्पाच्या मुद्द्याने राजकीय वातावरण आणखी तापलं आहे. आमदार रोहित पवार आणि निलेश लंके यांनी या प्रकल्पावरून आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी थेट रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. प्रकल्प रद्द करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित बैठकीत रोहित पवार उपस्थित असतानाही त्यांनी त्यावेळी भूमिका का मांडली नाही, असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला.

डिंभे-माणिकडोह बोगदा प्रकल्पाच्या मुद्द्यावरून सध्या आंबेगाव, जुन्नर, शिरूर आणि पारनेर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. प्रस्तावित बोगदा सुमारे १६ किलोमीटर लांबीचा असून, तो चुकीच्या पद्धतीने झाल्यास भविष्यात शेतीसमोर गंभीर जलसंकट निर्माण होऊ शकते, असा आक्षेप ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी यापूर्वी नोंदवला आहे. या प्रश्नावर मुख्यमंत्री यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर भूमिका मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

याच पार्श्वभूमीवर रोहित पवार आणि निलेश लंके यांनी आंदोलनाचा इशारा दिला. मात्र, राम शिंदे यांनी या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. हा प्रकल्प नेमका कोणाच्या काळात रद्द झाला, याचा आधी तपास करावा, असे त्यांनी म्हटले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रकल्प रद्द झाल्याचे दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले होते, याची आठवणही शिंदे यांनी करून दिली.

याच मुद्द्यावर बोलताना शिंदे यांनी रोहित पवारांना लक्ष्य केले. संबंधित बैठकीला रोहित पवार उपस्थित असतानाही त्यांनी त्यावेळी प्रकल्पाबाबत आक्षेप का नोंदवला नाही, असा सवाल त्यांनी केला. “बैठकीला उपस्थित असतानाही मग मूग गिळून का बसलेलात?” अशा शब्दांत शिंदे यांनी पवारांवर टीका केली. त्यामुळे बोगदा प्रकल्पाचा मुद्दा आता केवळ शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नापुरता मर्यादित न राहता अहिल्यानगरच्या राजकारणातील नव्या संघर्षाचे कारण ठरला आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून राम शिंदे आणि सुजय विखे यांच्यातही शाब्दिक संघर्ष सुरू आहे. यशवंतराव गडाख यांनी मांडलेल्या बिनविरोध निवडणुकीच्या भूमिकेचा सन्मान केला पाहिजे, असे शिंदे यांनी म्हटले आहे. एकमेकांची जिरवाजिरवी करण्याचे राजकारण बाजूला ठेवण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी ठेवीदार आणि कर्जदारांचे हित लक्षात घेण्याचे आवाहन केले. बँकेची निवडणूक प्रतिष्ठेचा विषय बनवली तर निवडणूक होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे एका बाजूला जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून शिंदे-विखे यांच्यातील वाद, तर दुसरीकडे डिंभे-माणिकडोह बोगद्यावरून शिंदे आणि रोहित पवार यांच्यातील संघर्ष, अशी दुहेरी राजकीय समीकरणे अहिल्यानगरमध्ये पाहायला मिळत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!