अजितदादांच्या निधनानंतर ‘सोमेश्वर’च्या निवडणुकीला वेगळं वळण; बिनविरोधासाठी शरद पवारांचा पुढाकार, ‘सिल्व्हर ओक’वर महत्त्वाची बैठक

बारामती : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीच्या राजकारणात हालचालींना वेग आला आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर होणारी सहकार क्षेत्रातील ही पहिली मोठी निवडणूक असल्याने या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ येथे सोमेश्वर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, खासदार पार्थ पवार, जय पवार आणि युगेंद्र पवार उपस्थित होते. निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका शरद पवार यांनी बैठकीत मांडल्याची माहिती आहे.


दोन्ही गटांकडून मोर्चेबांधणी
सध्या कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक मंडळ आहे. मात्र, बदललेल्या राजकीय परिस्थितीत विविध गटांकडून निवडणुकीची तयारी सुरू आहे. शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालीही इच्छुकांच्या भेटीगाठी आणि उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू आहे. भाजप आणि शिवसेनेकडूनही स्वतंत्र पॅनेलच्या तयारीच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे.
२१ जागांसाठी ५१४ उमेदवार
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळातील २१ जागांसाठी तब्बल ५१४ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे अंतिम पॅनेल निश्चित करताना विविध गटांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२६ आहे. त्यानंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
निवडणुकीचे मतदान ११ ऑक्टोबर रोजी, तर मतमोजणी १२ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे निवडणूक कार्यक्रमात नमूद करण्यात आले आहे.
पार्थ पवारांच्या फोटोवरूनही वाद
दरम्यान, कारखान्याच्या वार्षिक अहवालात खासदार पार्थ पवार यांचा फोटो किंवा नाव नसल्याचा मुद्दा चर्चेत आला होता. शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी यावरून कारखाना प्रशासनावर टीका केली होती. कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी ही बाब अनवधानाने झाल्याचे सांगत दिलगिरी व्यक्त केली होती.
आता ३० सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज किती मागे घेतले जातात आणि शरद पवारांच्या बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांना कितपत यश येते, याकडे बारामतीसह सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.