बैलपोळ्याच्या नैवैद्यासोबत सोन्याची पोत गिळून बैल थेट दवाखान्यात; एक्स-रेनंतर जे समोर आलं ते पाहून डॉक्टरही चक्रावले!


नाशिक : बैलपोळ्याच्या दिवशी पूजा करताना नैवेद्यासोबत सोन्याची पोत गिळलेल्या बैलाची अखेर शस्त्रक्रिया करून सुटका करण्यात आली. मालेगाव तालुक्यातील वनपट येथील शेतकरी शिवाजी बोरसे यांच्या बैलाने सुमारे तीन तोळे वजनाची सोन्याची पोत गिळली होती. विशेष म्हणजे, या पोतीसोबत बैलाच्या पोटात आणखी काही धक्कादायक वस्तू असल्याचे तपासणीत समोर आले. चाळीसगाव येथील पशुवैद्यकीय पथकाने शस्त्रक्रिया करून या सर्व वस्तू बाहेर काढल्या आणि बैलाचे प्राण वाचवले.

बोरसे यांच्या घरी बैलपोळा पारंपरिक पद्धतीने साजरा केला जात होता. बैलांचे पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला. याचवेळी ताटातील सोन्याची पोत बैलाने नैवेद्यासोबत गिळल्याचे नंतर लक्षात आले. बोरसे यांच्याकडे दोन बैल असल्याने नेमक्या कोणत्या बैलाने पोत गिळली, याचा सुरुवातीला उलगडा होत नव्हता.

पोत शेणातून बाहेर येईल, अशी आशा असल्याने कुटुंबीयांनी आठ-दहा दिवस प्रतीक्षा केली. मात्र, तसे न झाल्याने दोन्ही बैलांना चाळीसगाव येथील तालुका पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालयात नेण्यात आले. तेथे दोन्ही बैलांची क्ष-किरण तपासणी करण्यात आली. तपासणीत पोत नेमक्या कोणत्या बैलाच्या पोटात आहे आणि पचनसंस्थेतील कोणत्या भागात अडकली आहे, हे स्पष्ट झाले.

यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. यावेळी सुमारे तीन तोळ्यांची सोन्याची पोत, तिच्यासोबत असलेले ६३ मणी आणि इतर ४१ मणी बाहेर काढण्यात आले. मात्र, डॉक्टरांना आणखी एक धक्कादायक बाब आढळली. बैलाच्या पोटात टेनिस बॉलच्या आकाराचे दोन प्लास्टिकचे गोळे, नायलॉनचा धागा आणि काही नाणीही सापडली. प्लास्टिकच्या या गोळ्यांचे वजन सुमारे अर्धा किलो असल्याचे समोर आले.

पोटात साचलेल्या प्लास्टिकमुळे भविष्यात बैलाच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे सोन्याची पोत परत मिळण्यासोबतच बैलाच्या आरोग्याचा मोठा धोका टळला. शस्त्रक्रियेनंतर बैलाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.

पशुसंवर्धन विभागाच्या सहाय्यक आयुक्त डॉ. शितल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जावेद खाटीक यांनी शस्त्रक्रिया केली. पशुधन पर्यवेक्षक दीपक सपकाळे, अनिल अहिरे आणि गोरख भोई यांनी त्यांना सहकार्य केले. सोन्याची पोत सुखरूप परत मिळाल्याने आणि बैलाचे प्राण वाचल्याने बोरसे कुटुंबीयांनी पशुवैद्यकीय पथकाचे आभार मानले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!