घरी आलेला गॅस सिलिंडर उचलताच महिलेच्या मनात आली शंका; तपासणी केली अन् पुण्यातील मोठा गॅस घोटाळा उघडकीस

पुणे : पुण्यातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दापोडी परिसरात घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस काढून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार एका महिलेच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. या प्रकरणी दापोडी पोलिसांनी डिलिव्हरी टेम्पोसह तब्बल ४ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एका आरोपीला अटक केली आहे.
दापोडी येथील सुरेखा कांबळे यांनी एचपी कंपनीचा घरगुती गॅस सिलेंडर बुक केला होता. सिलेंडरची डिलिव्हरी मिळाल्यानंतर तो उचलताना त्याचे वजन कमी असल्याचा त्यांना संशय आला. त्यांनी वेळ न दवडता तत्काळ ११२ हेल्पलाइनवर संपर्क साधला.

माहिती मिळताच ११२ च्या मार्शल टीमने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर डिलिव्हरी पिकअप टेम्पो (क्र. KA 51 GA 7024) चा पाठलाग करून छत्रपती शिवाजी चौकात तो अडवण्यात आला. तपासणीदरम्यान ‘बी. डी. खांदवे एचपी गॅस एजन्सी’च्या माध्यमातून घरगुती सिलेंडरमधून गॅस काढून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे समोर आले.


३५ सिलेंडरमध्ये २ ते ४ किलो गॅस कमी
घटनेची माहिती मिळताच वैधमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक आदेश गायकवाड घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रमाणित वजनकाट्याच्या सहाय्याने टेम्पोमधील ४५ गॅस सिलेंडरची तपासणी केली. यावेळी तब्बल ३५ सिलेंडरमध्ये प्रत्येकी २ ते ४ किलो गॅस कमी असल्याचे आढळून आले.
सिलेंडरमधून काढलेला गॅस इतर ग्राहकांना अथवा हॉटेलचालकांना अवैधपणे विकण्याचा आरोपीचा डाव असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
या कारवाईत पोलिसांनी ३ लाख रुपये किमतीचा डिलिव्हरी टेम्पो आणि १ लाख ५३ हजार रुपये किमतीचे ४५ गॅस सिलेंडर असा एकूण ४ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
राजस्थानातील तरुणाला अटक
या प्रकरणी पोलीस राजेंद्र गर्जे यांच्या फिर्यादीवरून दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्यामलाल बिश्नोई (वय २०, मूळ रा. जोधपूर, राजस्थान) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
ग्राहकांनी सिलेंडर घेताना सतर्क राहण्याचे आवाहन
घरगुती गॅस सिलेंडरची डिलिव्हरी घेताना ग्राहकांनी विशेषतः महिलांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. सिलेंडरचे सील तुटलेले आढळल्यास किंवा वजनाबाबत संशय असल्यास तातडीने संबंधित यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
“घरगुती गॅस सिलेंडर घेताना सर्व ग्राहकांनी, विशेषतः महिलांनी अत्यंत सतर्क राहणे गरजेचे आहे. सिलेंडरचे सील तुटलेले आढळल्यास किंवा वजनात फरक वाटल्यास तत्काळ पोलीस प्रशासनाशी किंवा ११२ क्रमांकावर संपर्क साधावा,” असे दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार यांनी सांगितले.