‘सावित्रीबाईंचं नाव घेऊ नका’; चाकणकरांच्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या, ‘लिपस्टिक’च्या टोमण्याने वादाला नवं वळण


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील रुपाली चाकणकर आणि रुपाली ठोंबरे पाटील यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा पेटला आहे. यावेळी वादाचं कारण ठरलं आहे ते थेट क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव. चाकणकरांनी स्वतःची तुलना सावित्रीबाई फुले यांच्याशी केल्यानंतर ठोंबरे पाटील यांनी त्यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला.

चाकणकर यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांना उत्तर देताना, आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न होत असल्याचं म्हटलं होतं. सुमारे २०० वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले यांनीही चारित्र्यावरून आरोप सहन केले होते आणि आपणही ‘सावित्रीची लेक’ म्हणून या आरोपांविरोधात लढत असल्याचं त्यांनी सांगितलं. खोट्या आरोपांना आपण बळी पडणार नसल्याचंही चाकणकर यांनी स्पष्ट केलं.

मात्र, चाकणकरांच्या या विधानावर ठोंबरे पाटील यांनी जोरदार पलटवार केला. सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी अंधश्रद्धेविरोधात जनजागृती करण्यासाठी आयुष्य वेचलं, याची आठवण करून देत चाकणकरांना सावित्रीबाईंचं नाव घेण्याची पात्रता नसल्याचं त्यांनी म्हटलं. महिला आयोगाच्या पदावर असताना महिलांना संरक्षण आणि आधार देण्याऐवजी भोंदूबाबांच्या प्रकरणात महिलांना अडचणीत आणल्याचा आरोपही ठोंबरे यांनी केला. हे आरोप ठोंबरे यांच्या भूमिकेचा भाग आहेत.

वाद एवढ्यावरच थांबला नाही. ठोंबरे पाटील यांनी चाकणकरांवर वैयक्तिक स्वरूपाची बोचरी टीकाही केली. “लाली लिपस्टिक लावली म्हणजे अक्कल येते असं नाही,” असा टोला त्यांनी लगावला. चाकणकरांचा ‘वरचा मजला कमीच आहे’, अशी टिप्पणीही त्यांनी केली. त्यामुळे दोन महिला नेत्यांमधील शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

या वादामागे नाशिकमधील कथित भोंदू अशोक खरात प्रकरणाचीही पार्श्वभूमी आहे. या प्रकरणाच्या चर्चेदरम्यान चाकणकर यांचा अशोक खरात यांच्यासोबतचा फोटो समोर आल्यानंतर ठोंबरे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. आता सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भातील वक्तव्याने त्याला पुन्हा नवं वळण मिळालं आहे.

दरम्यान, चाकणकर यांनी आपल्यावरील आरोप खोटे आणि निराधार असल्याचं सांगत कायदेशीर पातळीवर लढत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे ठोंबरे यांच्या टीकेला चाकणकरांकडून पुढे काय उत्तर दिलं जातं, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!