पुण्यात विसर्जन मिरवणुकीचा ‘रूट प्लॅन’ ठरला! ६३८ मंडळं, १० हजार पोलीस अन् कुमठेकर-केळकरवर १५० मंडळांनाच प्रवेश

पुणे : गणरायाला निरोप देण्यासाठी पुणे शहर सज्ज झाले असून, अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीसाठी मोठी तयारी केली आहे. यंदा गर्दी आणि वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कुमठेकर आणि केळकर रस्त्यांवरून केवळ १५० गणेश मंडळांनाच मिरवणूक काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी याबाबत माहिती दिली. पुण्यातील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता आणि केळकर रस्ता या चार प्रमुख मार्गांवरून एकूण ६३८ गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका मार्गस्थ होणार आहेत. या पार्श्वभूमीवर तब्बल १० हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत.

कुमठेकर आणि केळकर रस्त्यांबाबत पोलिसांनी विशेष धोरण आखले आहे. गेल्या दोन वर्षांपासून विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या ठराविक गणेश मंडळांसाठी या मार्गांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे इतर भागातील मंडळांना या दोन रस्त्यांवरून मिरवणूक काढण्याची परवानगी दिली जाणार नाही. यंदा केवळ १५० मंडळांना या मार्गावरून मिरवणूक काढण्यासाठी कायदेशीर परवानगी देण्यात आली आहे.


गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातील विविध भागांमध्ये सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार आहे. विसर्जन सोहळ्यासाठी शहरात २६ ठिकाणी वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात पोलिसांनी आतापर्यंत साडेचार हजार प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांकडून आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
पुणेकरांना मिरवणुकीची माहिती एका क्लिकवर
विसर्जनाच्या दिवशी नागरिकांना मिरवणुकीची माहिती सहज मिळावी यासाठी पुणे पोलिसांनी विशेष ऑनलाइन सुविधा सुरू केली आहे. diversion.punepolice.gov.in या संकेतस्थळावर प्रमुख गणेश मंडळांच्या मिरवणुकीचे मार्ग आणि वाहतुकीतील बदलांची माहिती उपलब्ध होणार आहे. मागील वेळी या सुविधेचा तब्बल दोन कोटी सात लाख नागरिकांनी वापर केला होता.
मानाचे आणि प्रसिद्ध गणपती कोणत्या मार्गाने पुढे जात आहेत, सध्या मिरवणूक नेमकी कुठे आहे, याची अद्ययावत माहिती नागरिकांना मिळणार आहे. मिरवणुकीचे पुढचे आणि शेवटचे टोक कोणत्या ठिकाणी आहे, याची माहितीही उपलब्ध होईल. त्यामुळे कोणते रस्ते कधी बंद होतील किंवा पुन्हा वाहतुकीसाठी खुले केले जातील, याचा अंदाज नागरिकांना घेता येणार आहे.
वाहतूक बदल आणि वाहनतळांची माहितीही मिळणार
विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेले रस्ते, वाहतूक वळविण्यात आलेले पर्यायी मार्ग आणि परिस्थितीनुसार पुन्हा खुले करण्यात आलेल्या रस्त्यांची माहिती या संकेतस्थळावर अद्ययावत केली जाणार आहे. नागरिकांना वाहन पार्क करण्यासाठी उपलब्ध असलेल्या जागांची माहितीही मिळणार आहे. याशिवाय मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या गणेश मंडळांसाठी आवश्यक सूचना आणि उपयुक्त माहितीही ऑनलाइन उपलब्ध करून दिली जाणार आहे.
यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर भाविक पुण्यात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त, मार्गनियोजन, वाहनतळांची व्यवस्था आणि ऑनलाइन वाहतूक माहितीच्या माध्यमातून विसर्जन सोहळा सुरक्षित आणि सुरळीत पार पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.